अकोल्यातील बाजीगर, 80 मतं फोडली, तीनवेळा जिंकलेल्या बाजोरियांना हरवलं, कोण आहेत वसंत खंडेलवाल?
Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढणारे वसंत खंडेलवाल आहेत तरी कोण?
Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषद निवडणुकांच्या दोन जांगांचे निकाल हाती आले. निकालांमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला दुहेरी धक्का दिला आहे. नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरि यांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले आहेत.
अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत होती. बाजोरिया यांच्या रुपाने शिवसेनेचा बालेकिल्ला भेदण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे पर्यायाने खंडेलवाल यांच्यापुढे होतं. आतापर्यंत बाजोरियांच्या सोबतीला असलेले खंडेलवाल विधान परिषद निवडणुकीत मात्र तगड्या प्रतिस्पर्ध्याच्या रुपात बाजोरियांना भिडताना दिसले.
अकोला-बुलढाणा-वाशिम या तिन्ही ठिकाणी खंडेलवाल आणि बाजोरिया दोघांचाही दांडगा जनसंपर्क संपर्क होता. महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे जरी शिवसेनेचे असले तरी आतापर्यंत गोपीकिशन बाजोरिया यांनी केलेल्या काही चुका आणि मतदारांमध्ये असलेली नाराजी हे या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत आहेत. दुसरीकडे वसंत खंडेलवाल हे जरी सराफा व्यापारी असले तरी पूर्वीपासून संघ परिवाराशी जोडले गेलेले आहेत. खंडेलवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढणारे वसंत खंडेलवाल कोण?
- वसंत खंडेलवाल अकोल्यातील प्रख्यात सराफा व्यावसायिक
- खंडेलवाल घराणं संघ, जनसंघ आणि भाजपशी एकनिष्ठ. वसंत खंडेलवालांचे आजोबा 'काकाजी' खंडेलवाल आणि वडील मदनलाल खंडेलवाल विदर्भातील जनसंघ आणि नंतर भाजपचे जेष्ठ नेते
- खंडेलवाल कुटुंबीयांशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे कौटूंबीक संबंध
- वसंत खंडेलवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक
शिवसेनेला धक्का
अकोला-वाशिम-बुलढाणा हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात होता. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहुमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. 1998 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2004 पासून शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजोरिया सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.