Maharashtra Politics BJP MNS : मनसेसोबत भाजपची युतीची चर्चा? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले...
Maharashtra Politics BJP MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
Maharashtra Politics BJP MNS : राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युती होणार (BJP MNS Alliance) असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या तरी भाजपकडून एकनाथ शिंदे, आठवले गटासह एनडीएतील घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात इमानदारीने चालणारी शिवसेना आणि आम्ही युतीत निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तरी मनसेसोबत युतीची चर्चा सुरू नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Vidarbha Tour) यांनी आज बावनकुळे यांची कोराडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यापूर्वी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी जेव्हा मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो तेव्हा त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. नागपुरात आल्यावर चहा घ्यायला या अशी विनंती केली होती. त्यामुळे आज ते घरी येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आजच्या भेटीचा काहीही राजकीय अर्थ नसून यावेळी राजकीय चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिलदार मित्र
राज ठाकरे हे मैत्री दिलदारपणे निभवतात असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याशी माझे 18 वर्षांपासूनची मैत्री संबंध आहे. आजच्या भेटीचा राजकीय अर्थ नसून राजकीय चर्चादेखील नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. आमचे घर हे राजकीय चर्चा करण्याचे ठिकाण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनसेनी आपले काम सुरु केले आहे. काल त्यांनी विधानसभा निहाय बैठका घेतल्यात. ते आपला पक्ष वाढवत आहे आणि भाजप आपलं काम करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मनसेनी काम सुरु केलं त्याची त्यांना शुभेच्छा आहे. मनसेचं आव्हान आहे की नाही ते जनता ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युतीचे काय?
युतीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शिंदे यांच्या नेतृत्वात इमानदारीने चालणारी शिवसेना आणि आम्ही युतीत निवडणूक लढणार आहे. युतीत प्रत्येक उमेदवारामागे ताकदीने उभं राहणार. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव येत आहेत. शिंदे, भाजप, आठवले गटासह एनडीएचे पक्ष आता येवढीच युतीची चर्चा आहे. युतीबाबत मनसेची चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात ४५ पेक्षा जास्त विधानसभा जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.