(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Loudspeaker Row : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन भोंग्यांबाबत अंतिम निर्णय, पण.... : गृहमंत्री
Loudspeaker row भोंग्यांबाबत नियमावलीच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
Loudspeaker Row : नागपूर : "धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यांनी अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आयबी आणि रॉ यांच्याशीही बातचीत करु. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना परिणामही तपासले पाहिजेत," अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. "परंतु हा निर्णय कधी होणार, 3 तारखेच्या आधी होणार की 3 तारखेच्या नंतर होणार ते मी आज सांगू शकत नाही," असंही ते म्हणाले.
गृहमंत्री म्हणाले की, "भोंग्यांबाबत नियमावलीच्या मुद्द्यावर आज मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतला अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल आणि मगच निर्णय घेतला जाईल. हा निर्णय कधी होणार, 3 तारखेच्या आधी होणार की 3 तारखेच्या नंतर होणार ते मी आज सांगू शकत नाही."
केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण : दिलीप वळसे पाटील
राज ठाकरे यांचा अल्टिमेटम, सरकारची धावाधाव
मशिदीवरील भोंग्यावरुन सुरु असलेलं राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दिल्यानंतर आता राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहे. भोंग्यांबाबत नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे हे पाऊल उचलावं लागलं का या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील यांनी नकारार्थी उत्तर दिलं.
ते म्हणाले की, "देशात आता वेगवेगळ्या प्रश्नावरुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरु आहे. खरंतर केंद्र सरकार आणि भाजपने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा करायला हवी. यावरुन लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी अशाप्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्या माध्यमातून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोक त्यामध्ये सामील होतात, असं मला वाटतं."
राज ठाकरे यांचा अल्टिमेटम
ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर सरकारला अल्टिमेटम दिला होता. "राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरुन आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. तसंच 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथे नमाज वाजेल तिथे हनुमान चालीसा लावणार."