Climate Change : ग्लोबल वॉर्मिंग, प्लास्टिक बंदीसाठी सर्वांनी एकत्र यावे, स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्तांचे आवाहन
नागपूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात, देशातील राहण्यायोग्य शहरात आपल्या शहराचे नाव उंचविले जावे, जीवनमान उंचावेल यादृष्टीने कर्मचाऱ्याने कार्य करावे, असेही आयुक्त म्हणाले.
नागपूर : आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. यापुढची वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडे असेल. पुढील 25 वर्षात आपल्याला साधावयाच्या उद्दिष्टाकडे प्रवास असेल. देशाच्या विकासासाठी आधी शहरांचा विकास होणे आवश्यक आहे. यात महत्वपूर्ण भूमिका महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिका ही नागरिकांशिवाय कार्य करणे शक्य नाही. त्यादृष्टीने नागरिकांच्या सहभागानेच कार्य सुरू राहतील. आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगने त्रस्त आहे. हवामान बदल अर्थात क्लायमेट चेंजचे परिणाम सर्वांनाच जाणवू लागले आहेत. प्लास्टिक बंदी हे पर्यावरणीयदृष्ट्या उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी नागरिकांची जबाबदार वागणूक आणि सहभाग अत्यावश्यक आहे. या अमृत महोत्सवीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हवामान बदल आणि प्लास्टिक बंदी संदर्भात नागपूर शहरातील रहिवासी म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपा आयुक्त म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 25 वर्ष हे देशासाठी सुवर्ण वाटचालीचे वर्ष असल्याचे सांगताना यादृष्टीने जगात आपली छाप सोडणारे कार्य करण्याकडे सूचित केले आहे. आपल्याला यादृष्टीने कार्य करताना इंडिया@75 ही आपल्या तरुण देशाची प्रतिमा नवीन आयडिया आणि इनोव्हेशनद्वारे अंमलात आणणे आणि नवीन संधी निर्माण करायच्या आहेत. देश पुढे न्यायचे असेल तर शहरे उन्नत होणे आवश्यक आहे. आज शहरीकरणात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. राज्यातील सुमारे 50 टक्के नागरिक शहरात राहत आहेत. शहरांच्या उन्नतीकरणाची मोठी जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग असल्याने लोकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्य करणे अत्यावश्यक आहे. या अमृत महोत्सवीय वर्षात नागपूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात, देशातील राहण्यायोग्य शहरात आपल्या शहराचे नाव उंचविले जावे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे जीवनमान उंचावेल यादृष्टीने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने कार्य करावे, असेही ते म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ध्वजारोहणानंतर त्यांनी शहरवासीयांना संबोधित केले. आयुक्तांनी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर ध्वजारोहण केले. यावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवसे उपस्थित होते. मनपाच्या अग्निशमन पथकाने याप्रसंगी आयुक्तांसह मान्यवरांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाला उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, मिलिंद मेश्राम, विजय हुमने, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, अशोक पाटील, डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक आयुक्त किरण बगडे, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता अजय मानकर, गिरीश वासनिक आदी उपस्थित होते.
ध्वजारोहण केल्यानंतर आयुक्तांनी अग्निशमन विभागातर्फे परेड चे निरीक्षण केले आणि मानवंदना स्वीकारली. परेडचे नेतृत्व कॉटन मार्केट चे स्थानक अधिकारी भगवान वाघ, लकडगंज चे उप अधिकारी दिलीप चव्हाण, सक्करदरा चे उप अधिकारी प्रकाश कवडकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आणि शुभांगी पोहरे यांनी केले.
उत्कृष्ट कार्यासाठी अधिकारी सन्मानित
नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सन्मानित केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात आयोजित कार्यक्रम आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी कार्याबद्दल उपायुक्त रवींद्र भेलावे आणि क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी पीयूष आंबूलकर, शिक्षण विभागातील कार्यासाठी शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर आणि शहरातील नागरिकांना शिस्त लावून जबाबदारीची जाणीव करून देण्याण्यासाठी उपद्रव शोध पथक कार्य करीत असल्याबद्दल पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांचा सत्कार करण्यात आला. मनपाचा मनाचा दुपट्टा आणि तुळशी रोप देऊन या अधिकाऱ्यांना आयुक्त राधाकृष्णन बी, स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना आणि राम जोशी यांनी सन्मानित केले.
विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मनपा आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.