Nagpur Crime : दुसऱ्याकडून फॉर्म भरुन घेणे महागात; बँकेच्या कर्मचाऱ्यानेच 20 ग्राहकांना 59 लाखांनी गंडवले
Bank Fraud : कर्मचाऱ्याने सह्या घेतलेल्या अर्जांच्या माध्यमातून ओळखीच्या खातेदारांच्या खात्यात RTGSच्या माध्यमातून पैसे वळते केले. तसेच FD करणाऱ्या ग्राहकांना बनावट प्रमाणपत्रदेखील दिले, हे विशेष.
Nagpur Bank Fraud : अर्ज भरत असताना दुसऱ्यावर विश्वास ठेवणे 20 बँक ग्राहकांना अतिशय महागात पडले आहे. अर्ज भरुन देण्याच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) नवीन सुभेदार ले-आऊट येथील शाखेतील कंत्राटी कर्मचाऱ्याने ग्राहकांना तब्बल 59 लाख रुपयांना गंडा घातला. त्यांनी फिक्स डिपॉझिटसाठी दिलेले पैसे त्याने ओळखीच्या बँक खात्यात वळते केले व ग्राहकांना चक्क बनावट प्रमाणपत्र देण्याचा देखील प्रताप केला. सक्करदरा पोलिस (Nagpur Police) ठाण्याच्या पथकाने आरोपी विपीन कश्यप याला अटक केली आहे.
विपीन देवीप्रसाद कश्यप (वय 30, राजापेठ बसस्टॉपजवळ, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून संबंधित बँकेत अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. बँकेत येणारे खातेदार आणि ग्राहक यांना अर्ज देणे, वेळ पडली तर ते भरुन देणे ही कामे तो करत असतो. तो नेहमी बँकेतच भेटत असल्याने अनेक ग्राहक त्याला बँकेचा कर्मचारीच समजत होते आणि त्याच्याशी संवाद साधत त्याला माहितीदेखील देत होते. याचाच गैरफायदा त्याने उचलला. 18 नोव्हेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2022 या कालावधीत त्याने 20 ग्राहकांची फसवणूक केली. त्यांचे फिक्स डिपॉझिटसाठी आवश्यक असलेले अर्ज भरुन व त्यावर त्यांच्या सह्या घेऊन त्याने पैसे खात्यात जमा करण्याचा दिखावा केला.
प्रत्यक्षात त्याने त्यांच्या सह्या घेतलेल्या अर्जांच्या माध्यमातून ओळखीच्या खातेदारांच्या खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे वळते केले. त्याने फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांना बनावट प्रमाणपत्र देखील दिले. डिसेंबर महिन्यात त्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक पीयूष थोटे यांच्या तक्रारीवरुन सक्करदरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विपीन कश्यप याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.
कर्मचाऱ्यांचाही सहभाग होण्याची शक्यता?
विपीन हा अस्थायी कर्मचारी असतानादेखील त्याने बिनदिक्कतपणे हा प्रकार केला. आरटीजीएस करुन पैसे इतरत्र वळते करण्याच्या प्रक्रियेत तसेच बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात बँकेतून तर कुणाचे सहकार्य लाभले नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत.
यापूर्वीही खासगी कर्मचाऱ्याकडून फसवणूक
नागपुरातील (Nagpur) फ्रेन्ड्स कॉलनीजवळ असलेल्या एका बँकेतही दोन महिन्यांपूर्वी एका कंत्राटी कर्मचाऱ्याने दोन महिन्यात साडेसात लाख रुपयाने काही ज्येष्ठ नागरिक असलेल्या खातेधारकांना गंडवले होते. एका खातेधारकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले होते. मात्र आपण पूर्ण रक्कम लगेच परत करतो, माझी लहान मुले आहे. माझं कुटुंब आहे. पोलिसांनी अटक केल्यास घरचे कसे जगणार म्हणून त्याने विनवण्या केल्याने संबंधीत खातेधारकांनी तक्रार परत घेतली होती. यासंदर्भात एफआयआर न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला नव्हता.
ही बातमी देखील वाचा...