मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची प्रश्नपत्रिका मी आताच फोडणार नाही: आदित्य ठाकरे
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज नागपूरमधून झाली. हिंगणा रोड येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांनी 'आदित्य संवाद' या तरुणांसोबतच्या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूर: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नागपुरात युतीसंदर्भात प्रशन विचारला असता उत्तर देण्याचं टाळलं. युतीबद्दल मी काहीही बोलणार नाही, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये युतीबद्दल चर्चा झाली आहे, त्यामुळे तेच युतीबद्दल बोलू शकतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे म्हणून मी युतीबद्दल काहीही बोलणार नाही असे सांगत युतीबद्दल भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा होत असल्याचे संकेत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज नागपूरमधून झाली. हिंगणा रोड येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांनी 'आदित्य संवाद' या तरुणांसोबतच्या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी युती जाहीर करताना जी पत्रकार परिषद झाली होती त्यात सर्व काही स्पष्ट करण्यात आले होते, तसंच आमची युती सत्तेसाठी नव्हे तर मुद्द्यांसाठी आहे असं देखील आदित्या यांनी म्हटलं. आमच्या समोर कर्जमुक्ती, शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्राचा विकास, राम मंदिराची निर्मिती असे अनेक मुद्दे असून ते आम्हाला साध्य करायचे आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री पदाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांनी सूचक उत्तर देत "त्यासंदर्भातला पेपर मी सध्या फोडणार नाही, निवडणूक लढवायची की नाही, निवडणूक कुठून लढवायची हे अजून निश्चित नाही. जनता जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन असं ते म्हणाले.
शिवसेना ही नेहमीच पक्ष आणि सरकारचा घटक पक्ष म्हणून नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. राज्यात झालेली कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने झाली असली तरी आमचं अंतिम उद्दिष्ट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे. पीक विमा योजनेसाठीही शिवसेनेने लढा दिला असून त्याचा आता शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक त्रुट्या असून ते दूर करण्याची गरज आहे असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं.
विरोधी पक्षांवर ईडीच्या कारवायांबद्दल प्रश्न विचारला असता "राज्यात विरोधी पक्ष आहे तरी कुठे" असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. 'आदित्य संवाद' या तरुणांसोबतच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या आणखी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.