NCP Nagpur : राष्ट्रवादीतून निलंबित सतीश इटकेलवार म्हणाले, पक्षाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण...
Teachers Constituency Elections Nagpur : उमेदवार म्हणून पारडे जड वाटले. त्यामुळे उमेदवारी कायम ठेवली. महाविकास आघाडीचा निर्णय आमच्या पक्षात होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे आधीच अपक्ष अर्ज सादर केला होता, असे इटकेलवार यांनी सांगितले.
Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ट्विस्ट संपण्याची सध्यातरी चिन्हे दिसत नाहीत. काल उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना सकाळी आपण उमेदवारी मागे घेणार अशी तयारी दर्शवून दुपारी राष्ट्रवादीतून (NCP) निलंबित झालेले सतीश इटकेलवार 'नॉट रिचेबल' झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे पक्षातून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली. मात्र, 'मी अर्ज भरला तेव्हाच सांगितले होते, की मी माघार घेणार नाही. नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडण्यात यावी. 16 जानेवारीपर्यंत म्हणजे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाचे मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तो मी केलासुद्धा. पण उपयोग झाला नाही, त्यामुळे मी उमेदवारी कायम ठेवली," असल्याचे इटकेलवार संध्याकाळी रिचेबल झाल्यावर माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीचेही काही खरे नाही
नागपूरची जागा आधी महाविकास आघाडीतर्फे (MVA) शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. ऐन वेळेवर ट्विस्ट आला आणि तिकडे नाशिकमध्ये शिवसेनेने अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. इकडे शिवसेनेच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली. त्यामुळे महाविकास आघाडीचेही काही खरे नाही, असे दिसू लागले. "ज्याप्रमाणे मी आपल्या निर्णयावर खंबीर राहिलो, त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची आशा लावून बसलेले शिक्षक भारती आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या उमेदवारांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे," असे इटकेलवार म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष म्हणाले, माघार घ्या, पण...
"पक्षाकडून मला आदेश आला होता की, तुम्ही माघार घ्या. पण मी प्रदेशाध्यक्षांना (Jayant Patil) सांगितले होते की, माझा विचार करावा. सहाही जिल्ह्यांतील शिक्षकांशी माझे बोलणे झाले होते. त्यामुळे माघार घेणे शक्य नव्हते आणि दुसरीकडे पक्षाचाही विचार करायचा होता. यामध्ये उमेदवार म्हणून पारडे जड वाटले. त्यामुळे उमेदवारी कायम ठेवली. त्यानंतर पक्षाने माझे निलंबन केले. महाविकास आघाडीचा निर्णय आमच्या पक्षात होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे आधीच अपक्ष अर्ज सादर केला होता," असे इटकेलवार यांनी सांगितले.
मला विजयाची खात्री
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करत आलो आहे. ही निवडणूक वेगळी आहे. यामध्ये मतदार हे शिक्षक आहेत. संघटनांची ही निवडणूक असते आणि त्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा असतो. यावेळी तर विनाअनुदानित शाळांचेही शिक्षक मतदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा वेगळी असणार आहे. गडचिरोलीपासून ते भंडारा गोंदिया जिल्ह्यापर्यंत माझा संपर्क दांडगा आहे. हा काही आजचा संपर्क नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करतो आहे. त्यामुळे विजयाची खात्री आहे, असे इटकेलवार यांनी सांगितले. माझी लढत भारतीय जनता पक्ष समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्यासोबत आहे. त्या दृष्टीने मी आणि माझी टीम तयारीला लागली आहे. आता जेवढे दिवस हातात आहेत, त्या दिवसांमध्ये प्रचंड मेहनत घेऊन लढत द्यायची आहे, असेही सतीश इटकेलवार म्हणाले. उमेदवारी अर्ज काम ठेऊन इटकेलवार कुणाची गणिते बिघडवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ही बातमी देखील वाचा...