Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनावर शंभर कोटींचे खर्च, तरी हे काय? खानपानाच्या व्यवस्थेवरुन अजित पवार संतापले
कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसेल, तर ही गंभीर बाब आहे. संबंधित यंत्रणा गंभीर झालेली दिसत नसल्याने अजित पवार संतापले.
Maharashtra Assembly Winter Session : आमदार निवासात (MLA Hostel) ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार परवा उजेडात आला होता. आज ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि कापताना आढळले. नागपुरात हिवाळी अधिवेशनावर आपण जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करतो. पण येथे साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली जात नाही. येथे आलेल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
नागपूर हिवाळी अधिवेशनात (Winter Assembly Session Nagpur) आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार परवा उजेडात आला होता. काल हा मुद्दा सभागृहात गाजला होता. कालच्या प्रकरणावरुन तरी खानपानाच्या व्यवस्थेच्या बाबतीत काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. पण आज सकाळी विधान भवन इमारत परिसरात (Vidhan Bhavan) असलेल्या शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि कापताना आढळले. त्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधीतांनी याची वेळेवर दखल घ्यावी असेही यावेळी पवार यांनी सांगितले.
...असे गलिच्छ प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत
याबाबतीत अजित पवार म्हणाले की, जवळपास शंभर कोटी रुपये आपण या हिवाळी अधिवेशनावर खर्च करतो. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे, त्यांच्या भल्याची कामे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच आम्ही काम करतो. पण कोट्यवधी रुपये खर्च करुन सुद्धा येथे येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसेल, तर ही गंभीर बाब आहे. नुकताच एक गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित यंत्रणा गंभीर झालेली दिसत नाही. त्यामुळे आजचा प्रकार घडला. असे गलिच्छ प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधित ठेकेदाराला (Contractor) कडक शब्दात तंबी द्यावी आणि पुन्हा का असला प्रकार उघडकीस आला, तर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण केवळ मंत्री, आमदार अन् अधिकारीच नाही, तर येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार घडता कामा नये, असेही अजित पवार म्हणाले.
ही बातमी देखील वाचा