Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा राज्यातील प्रादुर्भाव वाढला, 4 जिल्ह्यात रुग्ण, नागपूरमध्ये तीनजण पॉझिटिव्ह, एक रुग्ण गंभीर
Guillain Barre Syndrome Cases in Nagpur: पुण्यानंतर आता कोल्हापूर, सोलापूर नंतर आता नागपुरात देखील रूग्ण आढळले आहेत.
नागपूर: पुण्यानंतर आता राज्याच्या अनेक शहरांमध्ये देखील गुलेन बॅरी सिंड्रोमचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पुण्यानंतर आता कोल्हापूर, सोलापूर नंतर आता नागपुरात देखील रूग्ण आढळले आहेत, नागपुरात 3 रुग्णांना गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही रुग्णांवर नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, तरीही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. यामध्ये मेडिकलमधील एक रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयुत असल्याची माहिती समोर आली आहे. तर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दुसऱ्या रुग्णाची या आजारातून बऱ्यापैकी रिकव्हरी झाली आहे. तिसरा रुग्ण सध्या जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहे.
केंद्र सरकार ही अलर्ट मोडवर
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकार ही अलर्ट मोडवर आली आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने तज्ज्ञांचे सात सदस्यीय पथक नेमले गेले आहे. महाराष्ट्रातील आजाराची स्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीची नियुक्त केली आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण यात मदत करणार आहे. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही ही समिती लक्ष ठेवणार आहे. हे पथक आज पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे.
कोल्हापूरात दोन रुग्ण पॉझिटिव्ह
कोल्हापूरमध्येही दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी एक रुग्ण कर्नाटकातील कोगणोळी इथला तर दुसरा हुपरी येथील असल्याचे समजते.
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे सर्वाधिक 111 रुग्ण
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे सर्वाधिक 111 रुग्ण आहेत. यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोममुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )