Azadi Ka Amrit Mahotsav : 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मोफत ध्वज वितरण
शाळामध्ये एकाच घरातील एक पेक्षा जास्त भावंड असल्यास एकच तिरंगा वाटप करण्यात येईल. तसेच यानंतर जे ध्वज शिल्लक राहतील ते गावातील आर्थिक दुर्बल नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात येईल.
नागपूर : भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील शाळांमधून मोफत तिरंगा वितरण केले जाणार आहे. हे ध्वज प्राधान्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येईल. शाळामध्ये एकाच घरातील दोन व जास्त भावंड असल्यास दोघांना मिळून एकच तिरंगा वाटप करण्यात येईल. तसेच यानंतर जे ध्वज शिल्लक राहतील ते ध्वज गावातील आर्थिक दुर्बल नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात येईल.
त्यानुषंगाने जिल्ह्यातील पदाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत ऐच्छिक आर्थिक सहाय्यमधून गोळा झालेल्या निधीतून 50 हजार नग तिरंगा वाटपाची सुरुवात आज 8 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, कृषी व दुग्धव्यवसाय सभापती तापेश्वर वैद्य, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, व विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांचे उपसि्थतीत गटविकास अधिकारी कामठी, कळमेश्वर व सावनेर यांना वितरीत करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- स्वराज्य महोत्सव अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी हिरहिरीने भाग घेवून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वज संहिता पाळा : जिल्हाधिकारी आर. विमला
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या अस्मितेचे दर्शन घडविणे,स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी हर घर तिरंगा तसेच स्वराज्य महोत्सव राबविल्या जात आहे. मात्र हे करत असताना शहर असो वा गाव अतिशय स्वच्छ नीटनेटके राहील, यासाठी स्वच्छता मोहीम राबवा. कोणत्याही परिस्थितीत तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वराज्य महोत्सव व हरगड तिरंगा या उपक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. या उपक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वराज्य महोत्सव अंतर्गत प्रत्येक भागाने घेतलेल्या उद्दिष्टाचा त्यांनी आढावा घेतला.