Maharashtra Congress : कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदला, अध्यक्ष निवडीसाठी महाराष्ट्रातही निवडणूक घ्या; माजी आमदार आशिष देशमुख यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र
कॉंग्रेसने तत्काळ प्रदेशाध्यक्ष बदलावा आणि राष्ट्रीय पातळीवर जशी निवडणुकीने निवड झाली तशी महाराष्ट्रात निवडणूका घेऊन प्रदेशाध्यक्षांची निवड करावी अशी मागणी, माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.
Ashish Deshmukh on Maharashtra Congress president Nana Patole : महाराष्ट्रात अकार्यक्षम प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे राज्यात कॉंग्रेस पक्षाची अधोगती होत आहे. प्रदेशाध्यक्षांमुळेच गेल्या 2-3 निवडणुकीत उमेदवारीचा घोळ झाला आहे. पक्षातली बेबंदशाही संपली नाही तर राज्यात काँग्रेस नव्याने आलेल्या शिंदे गटाच्या ही मागे पडून पाचव्या नंबरला जाईल. त्यामुळे तात्काळ प्रदेशाध्यक्ष बदलावा आणि राष्ट्रीय पातळीवर जशी निवडणुकीने निवड झाली तशी महाराष्ट्रात निवडणुका घेऊन प्रदेशाध्यक्षांची निवड करावी अशी मागणी, कॉंग्रेसनेते माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. या मागणीला घेऊन त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची दिल्लीला भेट घेतली.
पत्रात ते म्हणतात, आपल्या नेतृत्वात कॉंग्रेस (Congress) प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी कॉंग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, कॉंग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. कॉंग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे.
आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, 'कॉंग्रेस फक्त राजकीय पक्ष नसून विचारधारा आहे. मात्र सध्या हा पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे. आपला कॉंग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.'
तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की
नाशिक येथे सुरु असलेल्या उमेदवारीच्या घोळावर देशमुख यांनी पत्रात लिहिले आहे की, "सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करु, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरु झाली आहे."
राज्यातील सत्तांतराचाही संदर्भ...
देशमुख यांच्या राज्यात झालेल्या सत्तांतरावर लिहीले आहे की, "डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरुन कॉंग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला. जून 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एकचे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. 4 जुलै 2022 ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉंग्रेसचे तब्बल 10 आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतानासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरवण्यात आले नाही.'
...म्हणून काँग्रेस पडली तोंडघशी
सर्व बाजूंनी काँग्रेस सपशेल तोंडघशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठिंबा दिलेले सत्यजीत तांबेंसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागेवर निवडून आले तर विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वत:च्या सत्तेची पडलेली आहे. अशा कॉंग्रेस विरोधी घटना घडत असताना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीतीही पत्राच्या माध्यमातून देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
ही बातमी देखील वाचा...