Nagpur Stray Dogs : अखेर दोन वर्षांनंतर मनपाला जाग; डिसेंबरपासून कुत्र्यांच्या 'नसबंदी'ला सुरुवात होणार!
Nagpur : महानगरपालिका प्रशासनाने निधीची कमतरता असल्याचे कारण देत, कुत्र्यांची नसबंदी सुरूच केली नव्हती. शहरातील अनेक विकासकामांना निधी नसल्याचे कारण देत 'ब्रेक' लावण्यात आला आहे.
Nagpur News : न्यायालयाने फटकार लावल्यानंतर अखेर नागपूर महानगरपालिका प्रशासनाला (NMC) जाग आली असून 28 महिन्यानंतर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या 'नसबंदी'ला मुहूर्त मिळाला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नसबंदी व अॅन्टी रेबीज वॅक्सिन लावण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) ला सुरुवात होणार आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या (stray dogs) वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Bombay High Court Nagpur Bench) याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मनपाच्या उपाय योजनांचा आढावा घेतल्यानंतर हायकोर्टाने मनपाला फटकारले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किती संस्था या मोहिमेत सहभागी होणार, हे ठरणार आहे. परंतु कुत्र्यांची नसबंदी 60 टक्क्यांनी महागली आहे. 1600 रुपये प्रति कुत्रा नसबंदी आणि वॅक्सिनेशनचे दर ठरवण्यात आले आहेत. 2017 मध्ये महानगरपालिकेत (Nagpur Municipal Corporation) प्रति कुत्रा 700 रुपये नसबंदी आणि रेबीज वॅक्सिनसाठी देत होती.
फेब्रुवारी 2020 मध्ये स्थायी समितीने 1000 रुपयांचे दर निश्चित केले होते. ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना संक्रमणामुळे नसबंदीची प्रक्रिया पूर्णतः थांबली होती. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली.
प्रत्येक कामात निधी नसल्याचे कारण पुढे..
शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी आपल्या कार्यकाळात 12 कोटी रुपयांची तरतूद करुन, शहरातील कुत्र्यांच्या नसबंदीची योजना तयार केली होती. मात्र ती कधीच पूर्ण झाली नाही. महानगरपालिका प्रशासनाने निधीची कमतरता असल्याचे कारण देत, कुत्र्यांची नसबंदी सुरुच केली नव्हती. शहरातील अनेक विकासकामांना निधी नसल्याचे कारण देत ब्रेक लावण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी नागपूरसर वाडी, कामठी, हिंगणाचा संयुक्त प्रस्ताव तयार करुन पाठवण्याचे निर्देश 15 फेब्रुवारी 2021 रोजी दिले होते. परंतु त्या संदर्भात निधी मंजूर करण्यात आला नाही. नागपूर शहरात कुत्र्याच्या नसबंदीसाठी 14.40 कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. तर वाडीसाठी 25.92 लाख, कामठीसाठी 64.80 लाख आणि हिंगणासाठी 1.42 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन पाठवला होता. या प्रस्तावानुसार नागपूर शहरात 90 हजार, वाडीत 1620, कामठीमध्ये 4050 आणि हिंगण्यात 8910 बेवासर कुत्र्यांची संख्या असल्याचा प्रस्तावात उल्लेख होता.
शहरातील उपाययोजना दृष्टीक्षेपात...
- पशुजन्य नियंत्रण (श्वान) नियम 2001 अंतर्गत शहरात 2006 पासून कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे.
- 2018 पासून ऑगस्ट 2020 पर्यंत मनपाने 1,666 कुत्र्यांची नसबंदी केली. यात 5244 नर व 4122 मादा कुत्र्यांचा समावेश होता.
ही बातमी देखील वाचा