माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर ईडीचे छापे
नागपूरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफर नगर परिसरात एकाच वेळेस ईडीच्या विविध टिम्सनी ही कारवाई केली.
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर आज प्रवर्तन निर्देशालय म्हणजेच ईडीने छापे टाकले. नागपूरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफर नगर परिसरात एकाच वेळेस ईडीच्या विविध टिम्सनी ही कारवाई केली.
सर्वात पहिली कारवाई शिवाजीनगर परिसरात हरे कृष्णा अपार्टमेंटमध्ये करण्यात आली. हरे कृष्ण अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर सागर भटेवारा या व्यावसायिकाच्या सदनिकेत ईडीचे तीन अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले. साडे सातला आलेले ईडीचे अधिकारी सव्वा अकराच्या सुमारास परतले. मात्र, या ठिकणी त्यांनी काय तपासले, कोणाची चौकशी केली याबद्दल कोणतीही माहिती ईडीकडून देण्यात आली नाही.
दुसरी कारवाई न्यु कॉलोनी परिसरात समित आयजॅक्स यांच्या घरात करण्यात आली. इथे ही ईडीचे तीन अधिकारी सकाळी साडे सातपासून दुपार पर्यंत कारवाई करत होते. आयजॅक्स यांच्या प्रशस्त बंगल्याच्या पहिल्या माळ्यावर ही कारवाई सुरू होती. मात्र, इथे ही ईडी कडून कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली नाही. तिसरी कारवाई जाफरनगर भागात कादरी बंधूंच्या ठिकाणी झाली. कादरी बंधू कॉन्स्ट्रकशन लाईनमध्ये आहेत. इथे ही ईडीकडून कारवाई बद्दल कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. ज्या तीन जणांच्या ठिकाणांवर ईडी कडून कारवाई करण्यात आली. ते तिघे ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोठे चिरंजीव सलील देशमुख यांचे मित्र आहेत.
सागर भटेवारा
अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचे खास मित्र सागर भटेवारा. त्यांचे वय सुमारे 40 ते 42 वर्ष आहे. सागर भटेवारा यांचे मोठमोठे गोदाम आहेत. शिवाय लॉजिस्टिक ( ट्रान्सपोर्ट ) व्यवसाय ही आहेत.विदर्भात अनेक ठिकाणी गोदाम आहेत.सागर भटेवारा अनिल देशमुख यांच्या निवडणूक प्रचारात ही काटोल भागात सक्रिय होते.अनिल देशमुख यांच्या ओळखीचा फायदा घेत त्यांचे व्यवसाय गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढल्याची माहिती आहे. सागर भटेवारा बद्दल कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या पोर्टल वरील माहितीप्रमाणे ते 8 विविध कंपन्यांमध्ये डायरेक्टर पदावर आहेत.
समित आयजॅक्स
समित 40 ते 42 वर्षांचे असून ते सलील देशमुख यांचे मित्र आहेत. पेज थ्री पार्टीज मध्ये झळकणारे समित आयजॅक्स यांचे देशमुखांशी व्यावसायिक संबंध असल्याची माहिती आहे.
कादरी बंधू
कादरी बंधू सुमारे 15 वर्षापासून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असून त्यांनी नागपुरात अनेक मोठ्या स्किम्स उभारल्या आहेत. त्यांच्या मार्फत देशमुख कुटुंबाशी संबंधित काही शैक्षणिक व इतर संस्थांच्या इमारतीचे बांधकाम झाल्याची माहिती आहे. कादरी बंधूंचे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अनिल देशमुख यांच्या मुलांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची चौकशी ईडी करत असल्याची माहिती आहे.