(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरी सव्वातीन तासानंतर ईडीचे तपासणी पूर्ण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी ईडीने छापे टाकले. सव्वातीन तासानंतर ईडीचे तपासणी पूर्ण झाली आहे.
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यावर होते. दरम्यान, वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेणे सुरू आहे.
ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले. वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेणे सुरू आहे. देशमुख यांचा धाकटा मुलगा ऋषी वरळीला आहे.
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे
मोठ्या फौजफाट्यासह कारवाई
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.
मुंबईतील वरळी परिसरातील सुखदा या इमारतीमधील देशमुख यांच्या घरात आज (25 जून) सकाळी सात वाजता ईडीचं पथक पोहोचलं. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक वरळी पोलीस देखील हजर होते. तर आज सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारात या कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली. नागपूर पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. या छापेमारीदरम्यान ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी देखील होते. यात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश होता. या कारवाईसाठी एवढी मोठी सुरक्ष का आणली असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
दरम्यान महिन्याभरापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. नागपुरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफरनगर परिसरात एकाच वेळी ईडीच्या विविध पथकांनी 25 मे रोजी कारवाई केली होती. सागर भटेवारा, समित आयजॅक्स आणि कादरी बंधू यांच्या ठिकाणांची ईडीने झाडाझडती केली होती.