Devendra Fadnavis : मी माझ्या आनंदासाठी फोटो शेअर केला, मूर्खांना मी उत्तर देत नाही; फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : ज्यांनी प्रभूश्री रामांचे अस्तित्वचं नाकारले, अशा मूर्ख लोकांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर : नागपूरहून प्रकाशित होणार्या दैनिक नवभारतच्या वतीने त्यावेळी प्रकाशित झालेला एक अंक माझ्याकडे पाठवला. ज्यामध्ये त्यांनी मला असे आवर्जून सांगितले, तुम्ही कारसेवेसाठी गेले होता, तो फोटो आमच्या संग्रही आहे. त्यामुळे त्यांचे आभार मनात मी ते छायाचित्र समाज माध्यमांवर शेअर केले. कारण त्यावेळची जी परिस्थिती होती त्याची आठवण मला झाली. त्यामुळे हे ट्विट म्हणजे कोणाला उत्तर नसून माझ्या आनंदासाठी मी ते छायाचित्र शेअर केलं. कोणाला उत्तर देण्याच्या भानगडीत मी पडत नाही. कारण ज्यांनी प्रभूश्री रामांचे अस्तित्वचं नाकारले, अशा मूर्ख लोकांना मी उत्तर देत नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
ज्यांनी रामांचे अस्तित्वचं नाकारलं, अशा मूर्खांना मी उत्तर देत नाही
अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश राममय झाला आहे. मी रामभक्त आहे, मी कारसेवक आणि रामसेवक आहे. त्यामुळे मी देखील राममय झालोय. आज टीका करणारे हे तेच लोक आहेत, ज्यांनी रामाचे अस्तित्व देखील नाकारले आहे. त्या ठिकाणी खरंच राम जन्माला आले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. जे लोक रामालाचं मानायला तयार नाही, अशांना मी कशाला उत्तर देऊ. त्यामुळे मी परत सांगतो, अशा मूर्खांना मी उत्तर देत नसल्याचे फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. आम्हीदेखील फेब्रवारी महिन्यात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाऊ. कारसेवेनंतर आता आम्ही राम सेवेसाठी निश्चित जाऊ, असे देखील फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
'देवेंद्र फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील', असे म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, आम्ही तुम्हाला काय पुरावे द्यायचे? तुमचे लोक तिथून पळून गेले. पण आमचे लोक बाबरी मशीदीच्या परिसरात होते. बाळासाहेब ठाकरेंनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली. तुमचा फोटो हा नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हिडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती.
हे ही वाचा:
अयोध्येतील कारसेवेला फडणवीस होते का? उपमुख्यमंत्र्यांनी थेट दाखवला पुरावा, म्हणाले...