ड्राइव्हरची व्यथा ऐकून चोराला फुटला पाझर; चोरलेले पैसे परत अकाउंटमध्ये डिपॉजिट
लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच एका ड्राइव्हरची ऑनलाईन फसवणूक करुन 15 हजार रुपये चोरले होते. ड्राइव्हरने त्या चोराला फोन करुन आपली परिस्थिती सांगितली. त्यावर चोराने या ड्रायव्हरचे अर्धे पैसे लगेच परत पाठवले.
नागपूर : लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद झाल्याने लोकं त्रस्त आहेत. मोलमजुरी करून कमावणारा कष्टकरी वर्ग तर सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. अशातच कोणाची आर्थिक फसवणूक होऊन बँकेतील सर्व रक्कम चोरट्यांनी पळवली तर? नागपुरात एका मिनीट्रक ड्राइव्हरसोबत असंच झालं. सर्व काही गमावलेल्या त्या ड्राइव्हरनेही चोरट्यांना फोन लावून आपल्या बिकट अवस्थेबद्दल असा हंबरडा फोडला की चोरांनाही पाझर फुटला. चोरांनी चोरलेल्या रकमेचा आर्धा भाग फोन ठेवण्याच्या आतच त्या ड्रायव्हरच्या अकाउंटमध्ये पुन्हा पाठवला. नागपुरात मिनी ट्रक ड्राइव्हर आणि चोर यांच्यात घडलेला हा कलगीतुरा.
ड्राइव्हर : भैया मैने आपका क्या बिगाडा था, मैं एक ड्राइव्हर आदमी हूँ, क्या गुन्हा किया मैंने. मेरे खाते में 15 हजार रुपये थे वो भी तुमने ले लिये. एक एक पैसा जोड़ जोड़कर मेहनत से कमा रहा हूँ, आज लॉकडाउन में आपने मेरा पैसा काट लिया, आपको शर्म आनी चाहिए, शर्म आनी चाहिए भाई, एक काम करो ना, मेरी जान ले लो ना.
फोनवर आपली व्यथा मांडताना रडण्याचा हा आवाज नागपूरच्या एका ड्राइव्हरचा आहे. तर तो ज्याच्यासमोर आपली व्यथा मांडत आहे तो एक चोर आहे, होय चोर. त्याचे झाले असे की लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेले प्रमोद सिंह त्यांच्या मालवाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकचा फास्टॅग रिन्यू करत असताना त्यांच्या बँक अकाउंट मधून चोरट्यांनी 15 हजार दुसऱ्या अकाउंटमध्ये वळवून घेतले. प्रमोद सिंह यांना एका बँकेची फास्टॅग रिन्यू करण्याची खोटी लिंक ऑनलाईन पाठवून त्यांचे सर्व बँकिंग डिटेल मिळविले. नंतर एका दुसऱ्या लिंकने प्रमोद यांच्या मोबाईलला काही वेळासाठी हँग करून बँक अकाउंटमध्ये असलेले सर्वचे सर्व म्हणजेच 15 हजार रुपये लंपास केले.
लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक घरी परतणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थलांतराची कार्यवाही
लॉकडाउनच्या काळात वाहन घरासमोर उभे असताना बँकेचे हफ्ते थकण्याची भीती असताना 15 हजार गमावल्यामुळे प्रमोद सिंह यांच्यासमोर आता खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांना सायबर सेलकडे जाण्यास सांगितले. अखेर प्रमोद यांनी स्वतःच चोरांना जाब विचारण्याचे ठरवले. पुन्हा त्याच नंबरवर कॉल करणे सुरु केले. अनेक कॉल केल्यानंतरही समोरून कोणतेही उत्तर आले नाही. मात्र, चोरट्यांनी चोरलेले 15 हजार रुपये, जीवन मरणाचा प्रश्न असल्याने प्रमोद यांनीही चोरांचा पिच्छा सोडला नाही. सतत कॉल करत राहिले. अखेरीस चोराने कॉल उचलला आणि प्रमोद सिंह यांनी आपली व्यथा सांगत चोराना चांगलेच सुनावले. मग हंबरडाच फोडला.
ड्राइव्हर : थोड़ा भी दर्द नहीं लगा आपको कि यह आदमी किस मुसीबत में है, बच्चे की तबियत ख़राब है, तुम थोड़ा भी शर्म नहीं किये, थोड़ी भी तुमको दया नहीं आयी, आदमी इस समय एक एक पैसे के लिए मर रहा है, एक टाइम खाना खाकर रह रहे है, पुलिस ने मारा तो दवा करने के लिए पैसे नहीं है, दवाई नहीं कर पा रहा हूँ, और आपने पूरा 15 हजार रूपये काट लिया.
प्रमोद सिंह यांची व्यथा आणि त्यांचं रडणं ऐकून अखेर चोरांनाही पाझर फुटला. त्यांनी ही प्रमोद यांना धीर देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली.
चोर : आप रोइये मत, आप अपना अकाउंट नंबर बोलिये, आप रो मत, अकाउंट नंबर और आयएफएससी कोड बोलिये. पहले खुश हो जाईये और अकाउंट नंबर बताईये.
खरोखर फोन ठेवताच प्रमोद सिंह यांच्या बँक अकाउंटमध्ये चोराने त्याच्या अकॉउंट मधून 5 हजार आणि 3 हजार असे आठ हजार रुपये परत पाठवले होते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, कामधंदे बंद आहेत. मोलमजुरी, कष्ट करून कमावणाऱ्यांची अवस्था सर्वात जास्त बिकट आहे. अशातच चोरट्यांनी ऑनलाईन व्यवहारांमध्ये लोकांची फसवणूक करण्याचा सपाटाच लावला आहे. प्रमोद सिंह यांचे पैसे चोरणाऱ्या चोर मोठ्या मनाचा असल्याने त्याने पैसे परत केले. मात्र, प्रत्येक चोर असा वागणार नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे हेच जास्त गरजेचे आहे.
Prithviraj Chavan Facebook LIVE | शेतकऱ्यांचं संपूर्ण वीज बिल माफ करा : पृथ्वीराज चव्हाण