कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा : सरकार
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने सर्व सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केला आहे. कोणत्याही रुग्णाला तपासल्याशिवाय परत पाठवू नका तसंच कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करा, असं सरकारने आदेशात म्हटलं आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यातच राज्य सरकारने कोविड19 आणि नॉनकोविड रुग्णांसदर्भात सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केला आहे. रुग्णालयात आलेल्या कोणत्याही कोविड 19 किंवा नॉन कोविड रुग्णाला तपासणीशिवाय परत पाठवू नये. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवावर 12 तासात अंत्यसंस्कार करा, असं सरकारने आदेशात म्हटलं आहे. याशिवाय आणखी महत्त्वाचे निर्देशही दिले आहे. 2 मे सकाळी 10 वाजल्यापासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने बऱ्याच सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार नाकारले किंवा उशिरा केले जात आहेत, किंवा रुग्णाला दाखल करुन घेण्यात उशीर होतो किंवा अॅम्ब्युलन्स मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी आपत्ती व्यवस्था कायदा 2005 आणि साथ प्रतिबंध कायदा 1897 चा वापर करुन हा आदेश जारी केला आहे.
सरकारच्या आदेशात काय म्हटलं आहे?
- रुग्णालयात येणारा कोणताही कोविड 19 किंवा नॉन कोविड रुग्णाची तातडीने तपासणी करुन पुढील उपचार करावेत. तपासणी आणि उपचाराशिवाय कोणत्याही रुग्णाला परत पाठवू नये
- मुंबईतील अॅम्ब्युलन्स उपलब्धता आता मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन सेलकडे सोपवण्यात आलं आहे.
- कोविड संशयित रुग्णांच्या टेस्ट केल्याच पाहिजेत. 12 तासाच्या आत रिपोर्ट घेणे आणि त्यानुसार पुढील कारवाई झाली पाहिजे.
- कोविड रुग्णाच्या मृत्यूनंतर 30 मिनिटाच्या आत मृतदेह वॉर्डमधून बाहेर काढला पाहिजे आणि नंतरच्या प्रक्रिया पूर्ण करुन 12 तासाच्या आत अंतिम प्रक्रिया पार पाडली पाहिजे.