Nagpur BJYM : कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर विरोधात नागपुरात तक्रार दाखल
धानोरकर यांचे वक्तव्य जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोपा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आला. पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून उचित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
नागपूरः काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव यात्रेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा ने आज धंतोली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कॉंग्रेसच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशव्यापी आजादी गौरव यात्रा काढण्यात आली होती. 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे. ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते असे वक्तव्य केले होते.
धानोरकर यांचे वक्तव्य जातीजातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा आशयाचे असल्याचा आरोपा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आला. धानोरकरांचे वक्तव्य आक्षेपार्ह असून पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून बाळू धानोरकर विरोधात उचित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. धानोरकर यांचा हेतू समाजात जातीय विद्वेष निर्माण होईल असाच होता. त्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आज दुपारी नागपूरच्या धंतली पोलीस स्टेशनमध्ये अचानक भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते गोळा झाले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत धानोरकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. फडणवीस हे नागपूरचे असून त्यांनी नागपुरात अनेक ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांना पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. भाजपमध्ये कधीही जबाबदारी देताना जात पाहिली जात नाही, असा दावा तक्रार करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाचा महामंत्री दीपांशू लिंगायत याने केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
काय म्हणाले होते कॉंग्रेस खासदार ?
'ब्राम्हणांची पोरं बदाम-खारका खातात आणि बहुजनांची जांभया देतात' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाषणात लगेच पलटी मारत अशी काही काही लोकं असतात, अशी सारवासारव केली. महाराष्ट्रातील काँग्रेसचे लोकसभेतील बाळू धानोरकर हे एकमेव खासदार आहेत. शिवसेनेतून काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. या आधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून वाद ओढविला आहे. अशा वक्तव्यामुळं समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अशी वादग्रस्त वक्तव्य टाळली पाहिजे, असं मत व्यक्त केलं जात होतं.
Azadi Ka Amrit Mahotsav : फाळणीच्या वेदनांच्या आठवणीने अनेकांना अश्रू अनावर होतात तेव्हा...
वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध
यासंदर्भात हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले, कुणाचंही खाण-पिणं काढणं हे मुर्खपणाचे लक्षण आहे. त्यामुळे बाळू धानोरकरांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. हिंदू धर्मात क्लेष उत्पन्न करून त्यांना काय मिळते, हेच कळत नाही आहे. एका विशिष्ट समाजातली सर्व मुलं काजू-बदाम खातात आणि दुसऱ्या समाजातील सर्व मुलं जांभया देतात, असं कुठेही नाही. काँग्रेसच्या कार्यक्रमात बाळू धानोरकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ब्राम्हणांची मुलं खारका-बदामा खातात. बहुजनांची मुलं जांभया देतात. फडणवीसांबद्दल बोलताना बाळू धानोरकर यांचा तोल सुटला. किती नालायक लोकं आहेत. आपण अनुभवलं ना, असंही धानोरकर म्हणाले.