(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir : चांदीची वीट घेऊन सात युवक निघाले अयोध्येला; सायकलीने करणार 1150 किलोमीटरचा प्रवास
Nagpur News : हैदराबादच्या भाग्यनगर येथून 7 रामभक्त सायकलीने अयोध्याच्या राम मंदिरासाठी निघाले आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रवासात त्यांनी आपल्या सोबत चांदीची एक किलो वजनाची वीट देखील घेतली आहे.
नागपूर : बहुप्रतिक्षित अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्याची जय्यत तयारी अयोध्येत (Ayodhya) सुरू असून राम मंदिर उभारणीतील शेवटच्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यावर जोर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर तमाम रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच आता तेलंगाणाच्या (Telangana) हैदराबादमधील भाग्यनगर डबीलपुरा येथून 7 रामभक्त युवक सायकलीने 1150 किलोमीटरचा प्रवास करीत अयोध्येसाठी निघाले आहे. विशेष बाब म्हणजे, रामललाच्या मंदिर निर्मितीमध्ये आपला देखील खारीचा वाटा असावा या उद्देशाने हे तरुण आपल्या सोबत चांदीची एक किलो वजनाची वीट घेऊन जात आहे. ही वीट मंदिराच्या निर्मितीसाठी दान स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे. हे सर्व युवक व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असून अय्यप्पा स्वामीचे सुद्धा ते भक्त आहेत. 17 डिसेंबर 2023 ला आपल्या प्रवासाची सुरुवात केलेल्या या युवकांनी एक ते दोन जानेवारी 2024 पर्यंत आयोध्या नगरी येथे पोहोचणार आहे.
हैदराबाद ते अयोध्या सायकलने करणार प्रवास
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या तमात भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असल्याचं देखील पाहायला मिळतयं. मात्र ते प्रत्येकाला सध्यातरी शक्य नसले तरी प्रत्येक रामभक्त आप आपल्या परीने प्रभू श्रीरामांची आराधना करण्यात तल्लीन झाला आहे. असेच काही तेलंगाणाच्या हैदराबाद मधील भाग्यनगर डबीलपुरा येथील 7 रामभक्त सायकलीने अयोध्येसाठी निघाले आहे. या दारम्याने ते हैदराबाद ते अयोध्या असा 1150 किलोमीटरचा सायकलने प्रवास करणार आहे. हे सर्व युवक व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर ( ठेकेदार ) असून अय्यप्पा स्वामीचे सुद्धा ते भक्त आहेत. 17 डिसेंबर 2023 ला आपल्या प्रवासाची सुरुवात केलेल्या या युवकांनी एक ते दोन जानेवारी 2024 पर्यंत आयोध्या नगरीत पोहोचणार आहे. अनिष श्रीनिवास, ए.देवराज, ए.नरेश, के. शिवा, जी. गणेश यादव, एम. महेश कुमार, एम.वमसी, पी.यादव, बलराम रेड्डी, डी आदर्श, सचिन अशी या सात युवकांसह अन्यकाहींची नावे आहेत. सध्या ते नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून जात आहे.
प्रवासात चांदीची एक किलो वजनाची वीट
आमच्या कणाकणामध्ये हिंदुत्व असून आमचे आदर्श हे श्रीराम आहेत. त्यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू असून 22 जानेवारीला रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. याकरिता आपणाकडून खारीचा वाटा म्हणून चांदीची एक किलो वजनाची वीट आपण सोबत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज जवळपास 80 किलोमीटरचे अंतर आपण कापत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत साडेतीनशे किलोमीटर अंतर पार केले असून 800 किलोमीटरचे अंतर बाकी आहे. त्याप्रमाणे अंदाजे 2 जानेवारी 2024 ला अयोध्याला सायकलने पोहचणार आहे. मार्गावरून जात असताना जेथे मंदिर मिळेल तिथेच आम्ही मुक्काम करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.