(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Metro : नागपूर मेट्रोच्या भाडेवाढीवरुन संताप; विद्यार्थ्यांनी पुन्हा धरली 'आपली बस'ची वाट
Nagpur Metro : नागपुरात ज्येष्ठ नागरिकांना तरी मेट्रो भाड्यात सवलत द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
Nagpur Metro News : नागपुरात महामेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ऑटोमोटिव्ह चौकाकडे जाणारा मार्ग सुरू झाला. असे असले तरी काही मेट्रो स्थानकांवर अद्यापही पार्किंगची सुविधा नाही. अशात भाडेवाढ केल्याने लोक संतापले आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने निषाद इंदूरकर यांच्या नेतृत्वाखाली महामेट्रो कार्यालय गाठून संताप व्यक्त केला. अधिकाऱ्याला निवेदन देऊन समस्या लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. या मार्गावरील सर्वात महत्त्वाचे इंदोरा मेट्रोस्थानक बराच काळ रखडल्याचे शिष्टमंडळाचे मत होते. आता आंदोलनानंतर कामाला सुरुवात झाली आहे. मार्ग सुरू होताच महामेट्रोने भाड्यात वाढ केली आहे, ही भाडेवाढ मागे घेण्याची मागणी होत आहे.
कडबी चौक स्टेशनचा आधार
चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सांगितले की, इंदोरा मेट्रो स्टेशन न बांधल्यामुळे उत्तर नागपुरातील नागरिकांना टेका नाका चौक किंवा कडबी चौकात असलेल्या मेट्रो स्टेशनचा सहारा घ्यावा लागतो, मात्र या ठिकाणी पार्किंगसाठी जागाच नाही. स्टेशनला लागून असलेल्या फुटपाथ स्वच्छ करण्यात आला. जिथे लोकांकडून वाहने उभी केली जातात. मात्र ही जागा पुरेशी नाही. 10-20 वाहने उभी केल्यावर इतर वाहनांसाठी जागाच उरत नाही. अशा स्थितीत वाहन कुठे लावायचे, ही समस्या आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा
शिष्टमंडळाने सांगितले की, रस्त्यांवरील वाहतूक पाहता सध्या मेट्रो ट्रेन ही लोकांची गरज बनली आहे. ज्येष्ठ नागरिकही गरजेच्या वेळी मेट्रोची मदत घेत असले तरी अचानक भाडे वाढल्याने त्यांची अडचण होत आहे. किमान ज्येष्ठ नागरिकांना तरी भाड्यात सवलत द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, पलाश लिंगायत, हर्ष बर्डे, अधिकांश हिरेखान, कृशाप मेश्राम, अनंत नंदगावे, अर्श पाटील, राहत बारसागडे, उदय सिंग, आदेश मेश्राम आदींचा समावेश होता.
असे आहे मेट्रोचे वाढीव प्रवासभाडे
मिळालेल्या माहितीनुसार आता 1 ते 6 किलोमीटरकरता प्रवाशांना 5 रुपये, 6 ते 9 किलोमीटरकरता 10 रुपये, 9 ते 12 किलोमीटरकरता 15 रुपये, 12 ते 15 किलोमीटर अंतरासाठी 20 रुपये आणि 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी 35 रुपये द्यावे लागेल. वरील दर कोराना काळापूर्वीसुद्धा लागू होते. आता एकदा पुन्हा मेट्रो व्यवस्थापनाने जुने दर लागू करण्याची घोषणा केली आहे.