(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar : रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, विधानभवनावर धडकताना पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्तेही आक्रमक
Rohit Pawar detained at Nagpur Lathicharge : युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी विधानसभवनाकडे कूच केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
नागपूर: नागपुरात पोहोचलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज (Rohit Pawar Nagpur Lathicharge ) केला आहे. आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले असून त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने, रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देऊ, असं रोहित पवार म्हणाले होते.
युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभात रोहित पवार यांनी आपल्या भाषणावेळी हे सांगितलं होतं. त्यानंतरही रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं निवेदन स्वीकारण्यास कोणी न आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवानकडे कूच केली. या कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी काही प्रमाणात लाठीचार्ज केला.
रोहित पवार काय म्हणाले?
राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. MPSC परीक्षेसंदर्भात प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत. पण या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवार म्हणाले. एखाद्या आमदाराचे जर कुणी ऐकत नसेल तर सामान्य माणसाचे कुणी ऐकणार? हे सरकार भित्रं आहे असंही ते म्हणाले.
यांना अहंकार, निवेदन स्वीकारण्यासाठी भाजप अध्यक्ष
या सरकारला अहंकार आहे. महिलांचे, तरुणांचे, MPSC परीक्षार्थींचे, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. याबाबते निवेदन दिले, हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करु असं म्हटलं. पण यांना अहंकार आहे. तहसीलदार आणि भाजपच्या अध्यक्षांना आमच्याकडे पाठवत आहेत. मग तुम्हाला काय म्हणायचंय? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत मग तुमची ताकद नाही का? आमदाराचे ऐकत नसतील तर गरिबांचे काय ऐकणार? शेतीचे पंचनामे झालेत का? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.
रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
या सर्व राडेबाजीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीजवळ ठिय्या मांडला. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे परिसरात एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.
ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड
दरम्यान, रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी पोलिस व्हॅनबाहेर ठिय्या मांडल्यानंतर, पोलिसांनीही बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा करुन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित पवार आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतर मग पोलिसांनी जबरदस्तीने कार्यकर्त्यांना गाडीत बसवलं. यानंतर पोलिसांनी रोहित पवार यांनाही ताब्यात घेऊन गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती कडे करुन रोहित पवार यांना ताब्यात घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र पोलिसांनी रोहित पवारांना ताब्यात घेतलं.
रोहित पवार डिटेन्शन सेंटरमध्ये
रोहित पवार यांना ताब्यात घेतलं आहे. अधिवेशन काळात जे नियमभंग करतात त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये नेलं जातं. रोहित पवार यांनाही याच डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले. त्यामुळे रोहित पवार विधानभवनात जाऊ शकले नाहीत.
याबाबत पोलीस म्हणाले, "रोहित पवार यांच्याशी आम्ही चर्चा केली. पण त्यांनी सहाकर्यास नकार दिला. युवा संघर्ष मोर्चा यांच्यामार्फत आंदोलन करण्यात येत होतं.रोहित पवार यांनी विधानभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे रोहित पवार यांना ताब्यात घेऊन डिटेन्शन सेंटरला नेण्यात आलं. या सर्व राड्याचं व्हिडीओ फुटेज आमच्याकडे आहे. ते पाहून आम्ही योग्य ती कारवाई करु"
ही बातमी वाचा: