(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : जिल्हाधिकारी कार्यालय होणार उत्तुंग; 11 मजल्यांची नवी इमारत, उपमुख्यमंत्र्यांपुढे इमारतीचे सादरीकरण
या प्रकल्पात शहर तहसील, सेतू, खनिकर्म व उत्पादन शुल्क विभाग असलेली जुनी इमारत व संजय गांधी निराधार भवन तोडण्यात येणार आहे. प्रथम तळमजला अधिक 6 (सात माळ्यांची) अशी इमारत तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
Nagpur News : जिल्हाधिकारी कार्यालयाची (Office of District Collector) अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी 11 मजल्यांची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे सादरीकरण नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमक्ष करण्यात आले. सध्याच्या इमारतीचा आणि नव्या सादरीकरणानंतर झालेल्या खर्चाची वाढ लक्षात घेता, निधी वाढवून देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी या आराखड्यास हिरवा कंदिलही दाखवला. त्यामुळे लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच महसूल आणि इतर संबंधित सर्व विभाग आणण्यासाठी नवीन भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. शहर तहसील, सेतू, खनिकर्म तसेच उत्पादन शुल्क विभाग असलेली जुनी इमारत व संजय गांधी निराधार भवन तोडण्यात येणार आहे. प्रथम तळमजला अधिक सहा (सात माळ्यांची) अशी इमारत तयार करण्याचे प्रस्तावित होते. बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. मंत्रालयाकडून यात त्रुटी काढून तो परत पाठवला होता. नंतर यात सुधारणा करण्यात आली. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर शासनाने या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले बदल
नवीन इमारतीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर (Vipin Itankar Nagpur Collector) यांनी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले. आता ही इमारत 11 माळ्यांची असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूंनी दोन इमारती असतील. या इमारतीचा आराखडा आणि नकाशा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करण्यात आला. त्यांनी इमारतीच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवला. आता पुढील प्रशासकीय कार्यवाही करुन लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
परिसराचे सौंदर्य वाढणार
सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसर हे विस्तीर्ण असले तरी ते हेरीटेज वास्तु असल्याने त्यात बाहय बदल करता येत नाही. त्यामुळेच जुन्या इमारतीच्या शेजारी दोन मोठ्या टोलेजंग इमारती उभारल्या जाणार आहे. सध्याची जुनी वास्तु तशीच कायम ठेवली जाणार आहे. तर, परिसरात इतरत्र विखुरलेले कार्यालय या दोन इमारतीत एकवटले जाईल. तसेच, संपूर्ण परिसराचे नुतनीकरण होणार असल्याने परिसराचे सौंदर्यही वाढेल. पार्किंग, हिरवळ तसेच इतर आवश्यक बाबींची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अत्याधुनिक अशा स्वरुपाचा हा परिसर असल्याने कार्पोरेट लूक या संपूर्ण परिसराला येईल.
ही बातमी देखील वाचा