Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा नागपुरात स्थापित होणार, 18 जून रोजी भूमिपूजन
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बाग जवळच्या कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ विशाल पुतळा स्थापित होणार आहे.
Nagpur News : नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) यांच्या सिंहासनारुढ 41 फुटांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) महाराज बाग जवळील कार्यालयीन परिसर यासाठी निवडण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा सिंहासनारुढ पुतळा नेमका कसा असेल आहे याचा फोटो आपण एबीपी माझावर पाहू शकतो.
18 जून रोजी भूमिपूजन; फडणवीस, गडकरी, अजित पवार उपस्थित राहणार
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महाराज बाग जवळील नागपूर विद्यापीठ परिसरात सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. येत्या 18 जूनला या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) येणार आहेत. तसंच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आणण्याचेही प्रयत्न आयोजकांकडून सुरु आहेत.
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जगातील सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा ठरणार आहे.
महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा ब्राँझ धातूचा
यंदा नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नेतृत्वात लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सिंहासनारुढ पुतळा ब्राँझ धातूचा असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातून रीतसर परवानगी घेण्यात आली आहे.
शिवरायांच्या सिंहासनारुढ पुतळा कसा असणार?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळाच्या चबुतऱ्याची लांबी 20 फूट, तर रुंदी 15 फूट तर उंची 9 फूट असेल. तर सिंहासनारुढ पुतळ्याची उंची 32 फूट असून त्यावरील छत्र 7 फुटांचं असेल. ब्राँझ धातूने बनवल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे वजन सुमारे दहा हजार किलो असण्याण्याची शक्यता आहे.
हेही वाचा