Nagpur G20 Summit : 40 देशांचे 140 प्रतिनिधी होणार सहभागी ; 30 कोटींचे बजेट पोहोचले 50 कोटींवर
Nagpur News : यापूर्वी जी -20 आयोजनासाठी सरकारकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली होती. ती आता 50 कोटी करण्यात आली असल्याची माहिती आहे.
Nagpur G20 Summit : जी -20 बैठक 21 आणि 22 मार्च रोजी नागपुरात (Nagpur) होऊ घातली आहे. त्यासाठी प्रशासन तयारीत व्यस्त आहे. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन तयारीचा आढावा घेत आहेत. दोन दिवसीय बैठकीसाठी 40 देशांचे 140 प्रतिनिधी येणार आहेत. पाहुण्यांसाठी वर्धा मार्गावरील दोन हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी जी -20 ची तयारी आणि आयोजनासाठी सरकारकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ती आता 50 कोटी करण्यात आली आहे. जी-20 दरम्यान नागपूरचे जागतिक दर्जाचे शहर म्हणून ब्रँडिंग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिकेवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या बैठकीत रिसर्च, इनोव्हेशन, इनिशिएटिव्ह, गॅदरिंग (आरआयआयजी) विषयावर विचारमंथन होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी असल्याने या बैठकीचा अजेंडा काय असेल, हे अद्याप कळू शकलेले नाही.
युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना
यावेळी भारत जी-20 चे अध्यक्षपद भूषवत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष देशभरातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या बैठकांकडे लागले आहे. नागपूरही जगाच्या नजरेत येणार आहे. शहरात सुरू असलेली विकासकामे मार्चपूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश डीसीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विमानतळापासून प्रतिनिधींकडून वापरल्या जाण्याची शक्यता असलेल्या सर्वच मार्गांचा कायापालट केला जाणार आहे. शहरातील ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा आदी ठिकाणच्या रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या वास्तूंची भव्यता, आकर्षकता याविषयीची माहिती सादरीकरणाद्वारे देण्याचेही नियोजन आहे.
पुण्यातील G-20 परिषदेत सहभागींमध्ये...
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या दोन दिवसीय बैठकांचे यजमानपद भूषवेल तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील बैठकांचे सहअध्यक्षपद भूषवत आहेत. पुण्यामधील पहिल्या आयडब्लूजी बैठकीमध्ये जी20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 65 प्रतिनिधी सहभागी झाले होते.आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छ्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील महापालिकांचे 300 अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. अनेक बैठका, चर्चा, विचारमंथन यांच्याबरोबरच वृक्षारोपण, सहभोजन, पुणे शहराचा हेरिटेज वॉक, महाबळेश्वर या नजिकच्या पर्यटन स्थळाला भेट असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले होते.
ही बातमी देखील वाचा...