Nagpur : आणीबाणीच्या काळात लोकशाही कुलूपबंद असताना नागपूर सेंट्रल जेलमध्ये पार पडलेली 'ती' खास निवडणूक; 500 कैद्यांचा सहभाग
Emergency Jail Election: आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर घाला घालण्यात आला होता, त्यामुळे कुठेही निवडणूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र आणीबाणीच्या त्या कठीण काळातही एक निवडणूक पार पडली होती,

Emergency Nagpur Jail Election: आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर घाला घालण्यात आला होता, त्यामुळे कुठेही निवडणूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र आणीबाणीच्या त्या कठीण काळातही एक निवडणूक पार पडली होती, आणि ती निवडणूक चक्क नागपूर सेंट्रल जेलमध्ये पार पडली होती. नेमकी काय होती ही निवडणूक आणि त्यामागील उद्देश नेमका काय? हे जाणून घेऊ.
नागपूरच्या तुरुंगात कैद्यांनी राबवली निवडणूक प्रक्रिया
आणीबाणीच्या काळात नागपुरातील संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना अटक झाली होती. सुरुवातीला अनेकांना नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र काही महिन्यांनी बहुतांशी पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची रवानगी नागपूर सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. लोकशाही प्रक्रियेमध्ये आदर्श निवडणूक कशी असावी, त्यासाठी प्रचार कसा असावा, उमेदवारांची निवड कशी असावी, मतदान प्रक्रिया कशी असावी हे समाजाला दाखवण्यासाठी नागपूरच्या तुरुंगात कैद्यांनी एक निवडणूक प्रक्रिया राबवली होती. त्यात दोन उमेदवार निवडणुकीत उभे करून सुमारे 500 मिसा बंदी कैद्यांनी त्यात मतदान ही केले होते, अशी माहिती लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवी कासखेडीकर यांनी दिली आहे.
...पण हे सर्व विसरता येणार नाही- रवि कासखेडीकर
आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली होती. मात्र नागपूर सेंट्रल जेलच्या आत प्रत्येकाला मनमोकळेपणाने विचार मांडता येईल असे एक खास व्यासपीठ तयार करण्यात आले होते. त्या काळात 16 महिने तुरुंगात राहावे लागले, त्याचा कोणतंही दुःख नाही, उलट लोकशाही वाचवण्याच्या राष्ट्रीय कामात सहभागी झाल्याचा समाधान वाटतंय. मात्र, आणीबाणीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तरुणांची करिअरची संधी बुडाली, हजारो लोकांना कौटुंबिक प्रसंगांना मुकावे लागले, अनेकांचे जीव ही गेले, हे सर्व विसरता येणार नाही, अशी भावना ही रवि कासखेडीकर यांनी व्यक्त केली आहे. आणीबाणीच्या काळात रवी कासखेडीकर त्यांचे वडील आणि आईसह 16 महिने तुरुंगात होते.
दरम्यान, देशात 25 जून, 1975 ते 31 मार्च, 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्यांना कारावास भोगावा लागला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























