मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या शिक्षकांना 30 जूनपर्यंत वर्क फ्रॉम होम
ई-लर्निंग सुविधेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरातून व्हाट्सअॅप , झूम, टेलिग्राम किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे असे सांगण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांमध्ये 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू तर झालं, मात्र शाळांमध्ये यायचं की नाही याविषयी संभ्रम होता. मात्र हा संभ्रम आता दूर झाला असून 30 जूनपर्यंत शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात अनेक कंटेन्मेंट झोन्स येत असल्याने तसेच मुंबई जिल्हा अद्यापही रेड झोनमध्येच असल्यामुळे शाळा सुरू होण्याबाबत अद्याप निश्चित तारीख ठरलेली नाही. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी योग्यवेळी योग्य परिस्थिती पाहून घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिक्षण सुरु आहे. त्यामुळे स्थानिक वाहतूक, शिक्षकांची सुरक्षा या साऱ्या बाबी लक्षात घेऊन 30 जूनपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत. मुंबईतील सध्याच्या स्थिती पाहता 833 कंटेन्मेंट झोन आहेत त्यामुळे 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळा सुरू होणे शक्य नाही. तसेच मुंबईत रेल्वे सेवा सुरु असली तरी त्यात शिक्षकांना प्रवेश नसल्याने वसई, विरार , पालघर , बदलापूर, ठाणे अशा ठिकाणांहून येणाऱ्या शिक्षकांचे हाल होत आहेत.
अनेक शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्याने तेथील शिक्षकांना शाळांच्या बाहेर उभे राहावे लागत होते. अनेक शिक्षक गावी आहेत मात्र वेतन कपातीच्या भीतीने ते खासगी वाहने करुन मुंबईत परतावे लागत आहेत, अशा अनेक समस्यांमुळे शाळा सुरु नसताना शिक्षकांना वर्क फ्रॉम होमच करू द्यावे अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, भाजप शिक्षक आघाडी , मुख्याध्यापक संघटना, शिक्षक भारती यांनी वारंवार केली होती.
मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा शिक्षण संचालकांना पत्र लिहून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शन करण्यासाठीचे पत्र पाठविले होते. या पार्श्वभूमीवर पुढील 30 जूनपर्यंत शिक्षकांनी शाळेत न येता घरुनच काम करण्याची परवानगीचे निर्देश शिक्षणाधिकारी पालकर यांनी दिले आहेत. ई लर्निंग सुविधेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरातून व्हाट्सअॅप , झूम, टेलिग्राम किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण द्यावे असे सांगण्यात आले आहे.
मात्र यासोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेमध्ये प्राप्त पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्यासाठी टप्याटप्याने बोलवायचे आहे. त्यासाठी गरजेप्रमाणे शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आदेशात म्हटले आहे. तसेच ज्यांना नवीन पाठयपुस्तके मिळणार नाहीत त्यांच्यासाठी सध्या मागील वर्षीची पाठयपुस्तके संकलित करून द्यायला सांगितली आहेत.
संबंधित बातम्या :
- शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी; प्रभावित क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण
-
Online Learning ऑनलाईन शिक्षण सुरू, पण शिक्षक-पालकांसमोर कुठल्या अडचणी? स्पेशल रिपोर्ट