'मुंबई सेंट्रल टर्मिनस'ला 'नाना शंकरशेठ टर्मिनस' यांचेच नाव का?
मुंबई सेंट्रल चे नाव बदलून नाना शंकरशेठ ठेवण्यात यावे अशी शिवसेनेची मागणी होती. आधुनिक मुंबईच्या उभारणीसाठी नानाचे प्रचंड मोठे योगदान आहे.
!['मुंबई सेंट्रल टर्मिनस'ला 'नाना शंकरशेठ टर्मिनस' यांचेच नाव का? Why is 'Mumbai Central Terminus' named as 'Nana Shankarsheth Terminus 'मुंबई सेंट्रल टर्मिनस'ला 'नाना शंकरशेठ टर्मिनस' यांचेच नाव का?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/06213015/WhatsApp-Image-2021-01-06-at-3.59.36-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील तिसऱ्या स्टेशनचे नाव बदलून त्या ठिकाणी नवीन नाव ठेवण्याची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या अशा मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरशेठ टर्मिनस ठेवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. सहा वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनीच राज्य आणि केंद्राला पत्र लिहून या नामांतराची मागणी केली होती. या मागणीला राज्यातील कॅबिनेटने मार्च महिन्यात मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्राच्या मंजुरीची वाट राहत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणा केली असता, केंद्रीय गृहरज्यमंत्र्यांनी अरविंद सावंत यांच्या पत्राला उत्तर देत नामांतराचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राच्या मंजुरीनंतर मुंबई सेंट्रलचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरशेठ टर्मिनस असे ठेवण्यात येईल.
मुंबईतील स्टेशनच्या नामांतराचा इतिहास
काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील एलफिस्टन रोड या स्टेशनचे नाव बदलण्यात आले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी मागणी केल्याने एलफिस्टन रोडचे नाव बदलून त्या ठिकाणी प्रभादेवी असे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील आधीच्या विक्टोरिया टर्मिनल्सचे नाव बदलून 1996 साली छत्रपती शिवाजी टर्मिनस असे ठेवण्यात आले. त्यानंतर 2017 साली हे नाव देखील बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले. इतकेच काय तर मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव देखील आधी बॉम्बे सेंट्रल असे होते. 1930 सालापासून ते 1997 पर्यंत बॉम्बे सेंट्रल असेच नाव होते. 1997 साली ते बदलून मुंबई सेंट्रल असे ठेवण्यात आले. न्यूयॉर्क येथील ग्रँड सेंट्रल स्टेशनच्या धर्तीवर ब्रिटिशांनी मुंबईतील या तेव्हाच्या सर्वात मोठ्या स्टेशन चे नाव मुंबई सेंट्रल असे ठेवले होते. मुख्य म्हणजे हे सर्व बदल शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात करण्यात आले आहेत.
नाना शंकर शेठ यांचेच नाव का?
नाना शंकर शेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक मानले जाते. त्याचप्रमाणे आधुनिक मुंबईचे शिल्पकार देखील म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे मूळ नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे असे होते. लोक त्यांना आदराने नाना म्हणत. त्यांचा जन्म 1803 साली तर मृत्यू 1865 साली मुंबईत झाला. ते एक व्यापारी होते. त्याचसोबत शिक्षण तज्ञ, समाजसुधारक देखील होते. भारतात आणि पर्यायाने आशियात रेल्वे सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते इंडियन रेल्वे असोसिएशनचे सदस्य होते. याच संस्थेमुळे इंग्रजांनी मुंबईत रेल्वे सुरू केली. भारतातील पहिल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजेच आताच्या मध्य रेल्वेच्या संचालकांपैकी एक होते. पहिल्या बोरी बंदर ते ठाणे धावलेल्या रेल्वेमध्ये त्यांनी गोल्डन पासने प्रवास केला होता. त्यावेळी रेल्वेत प्रवास करायला नागरिक घाबरायचे मात्र नाना यांनी स्वतः प्रवास करून लोकांची भीती दूर केली. तसेच रेल्वे टिकीट घरासाठी त्यांनी आपल्या बंगल्यातील मागील बाजूची जागा देऊन टाकली. मुंबईतील अनेक स्टेशनच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची जमीन दान केली तसेच निधी दिला. त्यांचा वाडा गिरगावात होता. त्यामुळेच पश्चिम रेल्वेवरील सर्वात महत्त्वाच्या स्टेशनचे म्हणजेच मुंबई सेंट्रल चे नाव बदलून नाना शंकरशेठ ठेवण्यात यावे अशी शिवसेनेची मागणी होती. आधुनिक मुंबईच्या उभारणीसाठी नानाचे प्रचंड मोठे योगदान आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)