Mumbai: वानखेडेंबाबत वारंवार वक्तव्य करून तुम्हाला काय साध्य करायचंय? हायकोर्टाचा नवाब मलिकांना सवाल
Mumbai: समीर वानखेडेंबाबत (Sameer Wankhede) वारंवार वक्तव्य करून तुम्हाला काय साध्य करायंचय?, असा थेट सवाल गुरूवारी हायकोर्टानं (Bombay High Court) नवाब मलिकांना (Nawab Malik) विचारला आहे.
Mumbai: समीर वानखेडेंबाबत (Sameer Wankhede) वारंवार वक्तव्य करून तुम्हाला काय साध्य करायंचय?, असा थेट सवाल गुरूवारी हायकोर्टानं (Bombay High Court) नवाब मलिकांना (Nawab Malik) विचारला आहे. तसेच हे कुठेतरी थांबवायला हवं, अन्यथा तुम्हाला वानखेडेंबाबत बोलायची दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल. अशाप्रकारची वक्तव्य करून तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या व्यक्तीची बदनामीच करत आहात. असा इशारा मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिकांना दिला आहे. मात्र आपण वानखेडेंबाबत करत असलेली वक्तव्य ही हायकोर्टानं याबाबत घालून दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहूनच केलेली आहेत असं उत्तर नवाब मलिकांच्यावतीनं देण्यात आलं. तेव्हा न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं ही गोष्ट सिद्ध करा अथवा परीणाम भोगायला तयार राहा असा इशारा देत शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सिद्ध करण्याचे निर्देश देत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. वारंवार कोर्टाचे निर्देश आणि हमी देऊनही नवाब मलिकांची वानखेडेंबाबत टिका टिप्पणी सुरूच असल्याचा आरोप करत ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यावर गुरूवारी सुनावणी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीय. याआधी उच्च न्यायालयातील खटल्यादरम्यान निकाल लागेपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी नबाव मलिकांनी दिलेली असतानाही नवाब मलिकांची वानखेडेंबाबतची वक्तव्य सुरूच आहेत. यामुळे मलिक यांनी न्यायालयाचा पुन्हा अवमान केल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 28 डिसेंबर, 2 आणि 3 जानेवारी रोजी मलिकांनी पुन्हा वानखेडेंबाबत विधानं करत बदनामी केल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेतून केला आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर न्यायालयाचा वारंवार अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच याचिकेच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल करावा, अशी मागणी वानखेडे यांनी या याचिकेतून केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात ही नव्यानं याचिका दाखल केली आहे. वानखेडेच्या जातप्रमाणपत्राबाबत सध्या जातपडताळणी कमिटीकडे सुनावणी सुरू आहे. त्याबाबतही नवाब मलिकांची सोशल मीडियावर, मीडियात टिका टिप्पणी सुरूच आहे. मुळात वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही मलिक यांच्याकडून पुन्हा बदनामी सुरूच असल्यानं ज्ञानदेव यांनी हायकोर्टात ही नवी अवमान याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी दिलेली हमी मोडत वानखेडेंबाबत अनावधानानं वक्तव्य केल्याबद्दल नवाब मलिकांनी कोर्टाची माफीही मागितली होती हे विशेष.
हे देखील वाचा-
- SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ, वाचा नियमावली
- तब्बल 17 लाखांच्या सोयाबीनची चोरी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासांत चोरीचा माल परत
- Antilia Case : सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते; परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha