Western Railway : गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुड न्यूज, पश्चिम रेल्वे लवकरच बांद्रा ते मडगाव एक्स्प्रेस सुरु करणार
Western Railway : पश्चिम रेल्वे लवकरच मडगाव-बांद्रा टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस सुरु करण्याची शक्यता आहे. ही एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा सुटेल.
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक कोकणात जात असतात. रेल्वे आणि रस्ते मार्गानं भाविक कोकणात जात असतात. गणेशोत्सव काळात कोकणात रेल्वेनं जाण्यासाठी भाविक काही महिने अगोदर तिकीट आरक्षित करत असतात. मात्र, अनेकांना रेल्वेचं तिकीट मिळत नाही. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वे लवकरच मडगाव- बांद्रा टर्मिनस- मडगाव ही एक्स्प्रेस सुरु करणार आहे. ही एक्स्प्रेस आठवड्यातून दोनवेळा धावणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक्स्प्रेस सुरु होणार असल्यानं कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं आहे.
पश्चिम रेल्वे बांद्रा -मडगाव मार्गावर ही एक्स्प्रेस चालवणार आहे. बांद्रा येथून बुधवारी आणि शुक्रवारी मडगावसाठी ट्रेन सुटेल. तर, मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी ट्रेन बांद्रा टर्मिनससाठी सुटेल. पश्चिम रेल्वे वसई पनवेल कॉरिडॉरचा पहिल्यांदा वापर करणार आहे. या मार्गाचा वापर सध्या मध्य रेल्वेकडून करण्यात येतो. या मार्गावरून मध्य रेल्वेच्या ट्रेन ठाणे पनवेल किंवा दिवा मार्गे धावतात.
स्थानिकांच्या मागणीनंतर मडगाव- बांद्रा टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसचा फायदा बोरिवली, वसई आणि विरार येथील नागरिकांना होणार आहे. या भागातील प्रवासी सध्या मध्य रेल्वेच्या सेवांवर आणि खासगी वाहनांवर कोकणात जाण्यासाठी अवलंबून असतात.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या संकेतानुसार ही एक्स्प्रेस गणेशोत्सावपूर्वी सुरु होऊ शकते. यंदा गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी ही एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. बोरिवली, वसई आणि पनवेल येथे या एक्स्प्रेसला थांबे असतील.ही एक्स्प्रेस सुरु होण्यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी गरजेची आहे. ती मिळाल्यानंतर ही एक्स्प्रेस सुरु होईल. मडगाव- बांद्रा टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेसला एलएचबी कोच असतील. या एक्स्प्रेसमध्ये एकूण 20 कोच असतील, अशी माहिती आहे.
या एक्स्प्रेसचा फायदा कुणाला?
पश्चिम रेल्वे प्रथमच वसई पनवेल या कॉरिडॉरचा वापर करुन बांद्रा टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरु करणार आहे. यामुळं वसई, विरार आणि बोरिवली मधील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी फायदा होणार आहे.
इतर बातम्या :