खचलेल्या रस्त्यामुळे प्रभादेवी अन् परळ भागातील पाणीपुरवठा आज विस्कळीत; महानगरपालिकेचं आवाहन
Prabhadevi Pothole: प्रभादेवी येथे खचलेल्या रस्त्यामुळे प्रभादेवी आणि परळ भागातील पाणीपुरवठा आज विस्कळीत होणार आहे.

प्रभादेवी येथे खचलेल्या रस्त्यामुळे प्रभादेवी आणि परळ भागातील पाणीपुरवठा आज विस्कळीत होणार आहे. प्रभादेवी, ना. म. जोशी मार्ग सखाराम बाळा पवार मार्ग, करी रोड परिसर, लोअर परळ परिसरातील आज पहाटे 4.30 ते सकाळी 7.45 पर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा दावा सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे आणि यातच अचनाकपणे खड्ड्याला मोठं भगदाड पडल्याचे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन-
66 इंचाच्या जलवाहिनीमधून गळती होत असल्याने हा खड्डा पडला होता आणि त्याचा दुरुस्तीचं काम महानगरपालिकेकडून सध्या सुरु आहे. यासाठी काल देखील काही वेळ पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. अजून काम न झाल्याने आज पहाटे देखील पाणीपुरवठा खंडित राहील अशी महानगरपालिकेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे महापालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. सदर विभागातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आल आहे.
ही गळती थांबवण्यासाठी काम हाती घेतल्यानंतर निदर्शनास आले की, जलवाहिनीच्या खालच्या भागातून पाणी गळती होत आहे.
— WARD GS BMC (@mybmcWardGS) September 12, 2024
या जलवाहिनीवरून प्रभादेवी, आदर्श नगर, साई सुंदर नगर, जनता कॉलनी व आजूबाजूचा परिसर या ठिकाणी दुपारी ३:३० ते सायंकाळी ०७ वाजेदरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. (२/४) pic.twitter.com/CDW2FEDNul
मनसे माजी नगरसेवक संतोष धुरी काय म्हणाले?
रस्ता खचल्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधीही असे प्रसंग घडलेले आहे. पाण्याची लाईन लिकेज आहेत तर काम का नाही करत?, सरकारची काम करायची इच्छा शक्ती नाही. इथे अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे. या रस्त्याचं काम होणं खूप गरजेचं आहे. सणासुदीचे दिवस आहेत. नशीबाने याठिकाणी मोठी दुर्घटना घडली नाही. माझी सरकारला विनंती आहे हा रस्ता काम होईपर्यंत बंद ठेवावा, असं मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी सांगितले.
























