उदय सामंत यांना शह देण्यासाठी शिंदेंनी राजन साळवींना सोबत घेतलं, ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप
Vinayak Raut On Rajan Salvi Resignation : एखाद्याला बेइमानी आणि गद्दारी करायची झाली तर कोणावर तरी त्याला खापर फोडावं लागणार, राजन साळवींनी ते खापर माझ्यावर फोडलं असं विनायक राऊत म्हणाले.

मुंबई : उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींना सोबत घेतल्याचं ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले. शिंदे गटाकडून राजन साळवी यांचा वापर करण्याचा केविलवाना प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला असून गुरुवारी ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.
विनायक राऊत म्हणाले की, राजन साळवी यांची कीव करावी वाटते. विधानसभेच्या पराभवानंतर राजन साळवे यांनी 100 बैठका घेतल्या आणि भाजपमध्ये जाणार असल्याचं त्यामध्ये सांगितलं. देवेंद्र फडणवीस आपल्याला विधान परिषद देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर भाजपने त्यांच्यासाठी कायमची दारं बंद केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेट दिली नाही.
ज्या सामंत कुटुंबाच्या विरोधात तथाकथित आरोळी फोडत होते त्यांचं पालकत्व राजन साळवी यांना स्वीकारावं लागणार आहे. हा त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूड आहे असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.
गेली 35 वर्षे शिवसेनेत राजन साळवी काम करत असताना त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं.एखाद्याला बेइमानी आणि गद्दारी करायची झाली तर कोणावर तरी त्याला खापर फोडावं लागणार आणि ते खापर माझ्यावर फोडलं असं विनायक राऊत म्हणाले.
राजन साळवी यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून कसे पैसे घेतले हे निलेश राणे यांनी एका वर्षांपूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं. राजन साळवी यांच्या निष्ठेचा बुरखा त्याच वेळी फाटला असं म्हणत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्यावर टीका केली.
राजन साळवींचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षसंघटना बांधणीच्या अनुषंगाने उपनेतेपदाच्या कार्याला योग्य न्याय देऊ शकत नस्ल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. राजन साळवी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, विधानसभा निकालानंतर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. तर दुसरीकडे साळवी समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षांतरासाठी त्यांच्यावर दबाब आणला. सत्तेत गेल्यास कार्यकर्त्यांना देखील फायदा होईल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सत्तेचा लाभ मिळेल ही देखील कार्यकर्त्यांची भावना झाली. त्याचसोबत पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक राजकारण, वरिष्ठांनी अपेक्षित अशी दखल न घेणे यामुळे साळवी नाराज झाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
