एक्स्प्लोर
उद्यापासून वाशी एपीएमसी पूर्णपणे बंद, सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी निर्णय
लॉकडाऊन असूनही लोक शहरात अजूनही भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जाताना दिसत आहेत. प्रशासनाने वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने याबाबत काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली होती
नवी मुंबई : जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी वाशी येथील एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र आता मसाला मार्केटचा व्यापारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणीनंतर एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. भाजी, फळ, कांदा, बटाटा मार्केट येत्या शनिवारपासून बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.
दुसरीकडे दाना मार्केटच्या माध्यमातून मुंबईत 2.5 लाख टन अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याने पुढील एक महिना पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यभरातून आणि परराज्यातून आलेले अन्नधान्य मुंबई , उपनगर , नवी मुंबईत पोहोचविल्यानंतर दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. रविवारी याबाबत माथाडी कामगार , व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी प्रशासन बैठक घेवून निर्णय घेणार आहे. मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा एपीएमसीमधून मुंबईत करण्यात आल्याने बाजार पुढील काही दिवस बंद राहिला तरी लोकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मोठ्या शहरात भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन
मोठ्या शहरात गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. भाजी खरेदीसाठी मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असूनही लोक शहरात अजूनही भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जातात. प्रशासनाने वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने याबाबत काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सरकार मोठ्या शहरात भाजी मार्केट बंद करण्याच्या विचारात आहे.
नवी मुंबईत नियम पायदळी
नवी मुंबई, पनवेलमधील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 50 च्या वर जाऊनही कोणत्याही प्रकारचा फरक येथील नागरिकांना पडताना दिसत नाही. सरकार, पोलीस यंत्रणेकडून वारंवार घरात बसण्याचे आवाहन करूनही वस्तू घेण्याच्या बहाण्याने, सकाळी जाॅगिंग करण्यासाठी लोकं अजूनही मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे या बाहेर पडणाऱ्या लोकांवर चाप लावण्यासाठी नवी मुंबई पोलीसांनी संध्याकाळी 5 नंतर संपूर्ण मार्केट बंद करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. मार्केटयार्ड आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू सुद्धा लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे. मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement