'व्हॅलेंटाईन डे'ला मजनूचा करेक्ट कार्यक्रम, नालासोपाऱ्यात छेड काढणाऱ्याला पोरीनं आणि आईनं धू-धू धुतलं, व्हिडीओ व्हायरल
Nalasopara Crime: या परिसरात मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत मोठी वाढ होत असून पोलिसांनी वेळीच याला आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबई: एकीकडे प्रेमाचा सण समजला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र पोरींची छेड काढणाऱ्या मजनूंची काही कमी नाही. काही मुली हा त्रास सहन करतात, पण काही अशा असतात की त्या मजनूला आयुष्याची अद्दल घडवतात. व्हॅलेंटाईन डेला काहीतरी तुफानी करायला गेलेल्या अशाच एका मजनूला मुलीने आणि तिच्या आईने चांगलंच धुतलंय. नालासोपाऱ्यात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणला बेदम चोप देण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नालासोपारा पूर्व आचोळे रोड डॉन लेन परिसरात सोमवरी सायंकाळी 4.15 वाजता ही घटना घडली. मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला त्या मुलीने आणि तिच्या आईने चांगलीच मारहाण केली. या मुलीने आणि तिच्या आईने या तरुणाला लाथा बुक्क्यांनीही मारल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी संगितलं. पीडित मुलगी आणि तिची आई या तरुणाला मारहाण करतानाचा सर्व प्रकार एका मोबाईल कैमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झाली नाही. तसेच पीडित मुलगी आणि तरुण कोणत्या परिसरातील राहणारे आहेत याची मात्र खात्री झाली नाही. या परिसरात मुलींची रोजच छेड काढली जाते, अशा प्रकारची टवाळकी करणारी तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडलाय अशी तक्रार या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मुलींची छेड होण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं आणि त्याला आळा घालावा अशी मागणी आता स्थानिकांमधून जोर धरत आहे.
व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी पट्ट्यानं चोरली चक्क इलेक्ट्रिक स्कूटी
कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर असलेल्या बेरोजगार तरुणाने आपल्या प्रेयसीला व्हॅलेंटाईन गिफ्ट देण्यासाठी चक्क इलेक्ट्रीक स्कूटी चोरी केल्याची घटना उजेडात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 3 लाख 90 हजार किंमतीच्या अन्य 5 बाईक सापडल्या आहेत.
वसईच्या माणिकपूर पोलीसांनी अटक केलेला हा आरोपी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर आहे. चंद्रेश पाठक असं आरोपीचं नाव असून तो दहिसरचा राहणारा आहे. आपल्या प्रेयसीला इलेक्ट्रिक स्कूटी गिफ्ट देण्यासाठी या तरुणाने चक्क ओला कंपनीची इलेक्ट्रिक प्रो गाडीच चोरली. नायगावला राहणारा निहाल घरत याने आपली ओला कंपनीची इलेक्टो प्रो ही गाडी नायगांव ब्रिजखाली पार्क केली होती. त्याची ही गाडी आरोपी चंद्रेशने चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना माणिकपूर पोलिसांना चंद्रेश पाठक हा आरोपी सापडला. प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी या पट्ट्याने इलेक्ट्रिक गाडी चोरल्याची माहिती समोर आली. आरोपी चंद्रेशकडून आणखीन 3 लाख 90 हजार किंमतीच्या अन्य 5 बाईकही सापडल्या आहेत. या आरोपींनी आणखीन बाईक चोरल्या आहेत का याबाबत आता माणिकपूर पोलीस तपास करत आहे.