उल्हासनगर महापालिकेत विद्यार्थ्यांच्या रेनकोटमध्ये घोटाळा? पावसाळा अर्धा संपल्यावर टेंडर
उल्हासनगर महापालिकेच्या शहरात 22 शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शालेय साहित्याचं टेंडर काढताना त्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढवून जवळपास साडेपाच हजार इतकी दाखवण्यात आली आहे.
मुंबई : पावसाळा जवळपास अर्धा संपल्यावर उल्हासनगर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीचं टेंडर काढल्याचं समोर आलं आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन रेनकोट हाती येइपर्यंत हिवाळा उगवणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
राज्यात महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश, बूट, शालेय साहित्य, रेनकोट असं साहित्य दिलं जातं. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसात हे साहित्य विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित असतं. मात्र उल्हासनगर महानगरपालिकेनं पावसाळा अर्धा संपत आल्यावर या साहित्याच्या खरेदीसाठी टेंडर काढलं आहे. ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात हे साहित्य, रेनकोट हाती येईपर्यंत हिवाळा उगवणार आहे.
त्यामुळे उल्हासनगर महापालिकेच्या या कारभारावर सध्या मोठी टीका होत आहे. हिवाळ्यात रेनकोट देणारी उल्हासनगर ही राज्यातलीच नव्हे, तर देशातील पहिली महापालिका असेल, अशी टीका केली जात आहे. तर विद्यार्थ्यांचेही यात मोठे हाल होता आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या शहरात 22 शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शालेय साहित्याचं टेंडर काढताना त्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढवून जवळपास साडेपाच हजार इतकी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेनं केला आहे. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे.
या सगळ्याला शिक्षण मंडळात सुरु असलेली अनागोंदी कारणीभूत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिक्षण मंडळात राजकीय वशिल्याने घुसलेल्या एका बड्या अधिकाऱ्याकडूनच हे उद्योग केले जात असल्याची चर्चा आहे. याबाबत शिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र सरकारकडून आलेले रेनकोट आणि इतर साहित्याचे पैसे थेट विद्यार्थ्यांना देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. एकंदरीत वातावरण पाहता शिक्षण अधिकाऱ्यांचा शिक्षण मंडळावर वचक नसल्याचं अनुभवायला मिळत आहे.
या सगळ्याबाबत उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांना विचारलं असता, प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या आणि टेंडरमधली संख्या यात फरक असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसंच याबाबत महापालिका आयुक्त योग्य ती कारवाई करतील, असं त्यांचं म्हणणं आहे.
उल्हासनगर महापालिकेत वर्षानुवर्ष शिक्षण मंडळात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आले आहेत. मात्र आजवर त्याची साधी चौकशीही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या साहित्यावर डल्ला मारणाऱ्या या प्रवृत्तींना आता तरी आळा घातला जातो का? हे पाहावं लागेल.