उबरचं मुंबईतील कार्यालय बंद, मुंबईकरांसाठी कॅब सेवा सुरु राहणार
कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे उबरने मुंबईतील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांसाठी उबरची कॅब सेवा सुरुच राहिल.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे उबरने आपलं मुंबईतील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर 45 कार्यालये बंद करण्याच्या निर्णयाअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. मात्र मुंबईकरांसाठी उबरची राईड-शेअरिंग कॅब सेवा सुरुच राहिल. अॅप आधारित कॅब सेवा देणारी अमेरिकन कंपनी उबरने (Uber) याआधीच देशात कर्मचाऱ्यांची कपात केली होती.
उबर कंपनीचं मुंबईतील कार्यालय कुर्ला परिसरात आहे. उबरच्या मुंबई कार्यालयात सुमारे 25 कायमस्वरुपी कर्मचारी आणि 150 पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी काम करतात. कार्यालय बंद करण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु ऑपरेशन आणि पॉलिसीअंतर्गत काही कर्मचारी काम करतील असं कंपनीने सांगितलं. तसंच मुंबईकरांना आपली चांगली सेवा देत राहू असंही कंपनीने म्हटलं आहे.
उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरॉवस्काई यांनी कर्मचाऱ्यांना मे महिन्यात पत्र लिहून सांगितलं होतं की, "कंपनीने जगभरातील 45 कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे." सिंगापूरमधील APAC कार्यालयही बंद केलं आहे. कंपनीने उबर इंडियाचे प्रमुख प्रदीप परमेश्वरन यांना जून महिन्यातच APAC चे प्रमुखही बनवलं होतं.
3700 कर्मचाऱ्यांची कपात कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे जगभरातील उबरच्या कारभारावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कंपनीला अनेक कार्यालयं बंद करावी लागली. उबरचे जगभरात एकूण 6 हजार 700 कर्मचारी आहे. त्यापैकी भारतातील 600 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर कंपनीने आपल्या 3 हजार 700 कर्मचाऱ्यांनाची कपात केली आहे.
डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश मुंबईतील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत घरातूनच काम करण्यासाठी सांगितलं आहे. कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मुंबईत इतर कोणत्या कार्यालयात पाठवणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कंपनी मुंबईमध्ये आपली सेवा सुरुच ठेवणार आहे.