स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड काळात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या वेतनाची वसुली; एसटीच्या व्यवस्थापनाचे तुघलकी फर्मान
वसुली करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
![स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड काळात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या वेतनाची वसुली; एसटीच्या व्यवस्थापनाचे तुघलकी फर्मान The wages paid by the ST employees who risked their lives and worked during the Covid period are being recovered स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड काळात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या वेतनाची वसुली; एसटीच्या व्यवस्थापनाचे तुघलकी फर्मान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/46d249a8c2ed8f1e7ba3cc25fe11d43e1718161797650987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: कोविड काळात लॉकडाऊन (Covid Maharashtra) असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पण नगर पालिका, हॉस्पिटल या ठिकाणी काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर राहता यावे यासाठी सरकारने फक्त एसटी सेवा सुरू ठेवली होती. त्यामध्ये मुंबई परिसरात एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होती. पण ग्रामीण भागात मात्र एसटी बस कमी प्रमाणात सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलाविण्यात येत होते. ज्यादिवशी कर्मचारी कामावर उपस्थित नव्हते. त्या दिवसाची हजेरी ग्राह्य धरून त्यांना सदर दिवसाचे वेतन राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे देण्यात आले. मात्र एसटीच्या सातारा विभागातील रोजंदार गट क्र. १ मधील कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या तब्बल ६९ लाख रुपयांच्या वेतन रक्कमेची वसुली करण्याचे आदेश एसटीच्या व्यवस्थापनाने दिले असून सदरची बेकायदेशीर वसुली थांबविण्यात यावी. तसेच राज्य भरातील विविध जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांना या कालावधीचे वेतन देण्यात आलेले नाही, त्यांना वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
कोविड काळात लॉकडाऊन असल्याने ज्या कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहता आले नाही. त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्कालीन सरकारच्या आदेशाने ३१ मार्च २०२० रोजी परिपत्रक प्रसिद्ध करून लॉकडाऊन असल्याने कामावर उपस्थित राहता आले नाही अश्या कर्मचाऱ्यांची हजेरी ग्राह्य धरण्यात येऊन त्यांना सदर कालावधीचे वेतन देण्याचे आदेश दिले होते. परिपत्रकात नमूद केल्या प्रमाणे सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थापना वरील सर्व कर्मचाऱ्यांना लॉक डाऊन काळातील हजेरी ग्राह्य धरून वेतन अदा करण्यात आले. पण एसटी महामंडळातील प्रशासनाने रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या सातारा विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले तब्बल ६९ लाख रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून हप्त्या हप्त्याने वसूल करण्याचे आदेश १३ एप्रिल २०२४ रोजी परिपत्रक काढून दिले व त्यातील दोन हप्ते वसूल करण्यात आले असून.हे अन्याय कारक आहे व यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची सर्वच बाबतीत चाललेली अवहेलना सहन केली जाणार नाही असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.
एसटी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कामावर हजर-
या शिवाय कोविड काळात शासकीय, निमशासकीय कर्मचारी ,हॉस्पिटल, जिल्हा परिषद, नगरपालिका व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या व त्या साठी सुद्धा राज्यभरातील अंदाजे पाच हजारापेक्षा जास्त रोजंदार गट क्र. १ मधील एसटी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक दिवसा -आड कामावर हजर होते. त्यांनाही ते उपस्थित नसतील त्या दिवसांचे वेतन देण्यात आले नाही असेही निदर्शनास आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. त्यांना सदर दिवसांचे वेतन देण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्यांना वेतन देण्यात आलेले आहे. त्यांच्या पगारातून समान हप्त्यात वसुली करण्याचे जे तुघलकी फर्मान काढले आहे. ते मागे घेण्यात यावे, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)