धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळायला हवे, मुख्यमंत्र्यांना उद्देशून माजीद मेमन यांचं ट्वीट
येत्या 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण असल्याचं कळतं. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजी माजीद मेमन यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्वीट केलं आहे.
मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याचं कळतं आहे. शिवाय उद्धव ठाकरेही भूमिपूजनाला जाणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. परंतु "धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळायला हवे," असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजीद मेमन यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलं आहे.
येत्या 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक 300 जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरु आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचंही नाव असल्याचं कळतं.
माजीद मेमन यांनी ट्वीट केलं आहे की, "उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमातील निमंत्रित पाहुण्यांपैकी एक आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. मात्र धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखाने असे धार्मिक सोहळे टाळायला हवे."
Uddhav Thakrey is among invitees for bhoomi pujan of Ram Temple. He may participate respecting Covid 19 restrictions in his personal capacity. The head of a secular democracy should refrain from promoting a particular religious activity..
— Majeed Memon (@advmajeedmemon) July 21, 2020
शरद पवार काय म्हणाले होते? कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. "राम मंदिर बांधून कोरोना जाईल असं भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही," अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली होती.
मुख्यमंत्री राम मंदिराच्या भूमिपूजनाला नक्की जाणार : संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला राम मंदिराच्या भूमिपूजनाला नक्की जाणार आहेत. या संपूर्ण विषयाशी शिवसेनेचे भावनिक, राष्ट्रीय, धार्मिक नातं कायमचं जोडलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळा मर्यादित लोकांमध्ये होणार आहे. 300 लोकांना निमंत्रित केल्याचं मी वाचल आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या
काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला
अयोध्येचा रस्ता शिवसेनेने बनवला, अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही : संजय राऊत