काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला
लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.
सोलापूर : उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं. ते आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
Ram Mandir | ठरलं!, अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन
कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील शरद पवार यांच्यासोबत होते. सोलापुरात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर राज्यात सर्वाधिक मृत्युदर असलेल्या शहरांपैकी सोलापूर देखील आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आधी देखील बैठक घेतल्या आहेत. मात्र शरद पवार यांच्या आपत्कालीन परिस्थितीतल्या नियोजनाचा अनुभव पाहता त्यांनी सोलापुरात येऊन मार्गदर्शन करावे अशी विनंती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली होती. त्यानुसार शरद पवार हे आज सोलापुरात आले होते.
शहरातील नियोजन भवन येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी जिल्ह्यातील कोरोनच्या स्थितीचा आढावा शरद पवार यांच्या समोर सादर केला. तर पवार यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्याकडून ही माहिती जाणून घेतली.
दरम्यान खासगी कोविड रुग्णालयातील बिलावर आता सरकारची नजर असणार आहे. या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 'कोरोनावर उपचर करण्यासाठी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड अधिग्रहित करण्यात आले आहेत. त्याठिकाणी उपचारासाठी लागणारे दर निश्चित केलेत त्यात कोणतेही छुपे दर नाहीत. सोबतच आता बिल मॉनिटर करण्यासाठी ऑडिटर नेमावेत असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही रुग्णाचे डिस्चार्ज होण्याआधी त्याचे बिल या सरकारी ऑडिटर तपासातील. सरकारी नियमानुसार दर आकारले असतील तरच हे ऑडिटर त्यावर स्वाक्षरी करतील. तेव्हाच हे बिल रुग्णाकडे देण्यात येतील' अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच IMA च्या डॉक्टरांची सेवा कोविड सेंटरला देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
सोलापुरात मृत्युदर कमी करण्यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करत असून डेथ ऑडिट कमिटी लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी सूचना दिल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसात सोलापुरात टेली आयसीयू सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तज्ञ डॉक्टर या सुविधेच्या माध्यमातून सोलापूरच्या रुग्णांना उपचार देऊ शकतील. त्याच प्रमाणे सोलापूरात 10 हजार लोकांचे अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहेत. सोबतच स्वतः शरद पवार यांनी आज सोलापूरसाठी 80 रेमडेविसीरचे इंजेक्शन शरद पवार यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
आज सोलापूर शहरातील कोरोनाच्या स्थितीबाबत झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी इतिहासचा दाखला देखील दिला. सोलापूर हे इंग्रजांवर मात करणारं हे शहर आहे. त्यामुळे कोविडवर देखील मात करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोलापूर शहरासह बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या ठिकाणी देखील जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधिंनी निधीची कमतरता असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या कानावर ही माहिती घालून सोलापूरला अधिकची मदत देण्यासाठी सांगू असे देखील पवार म्हणाले. त्याचप्रमाणे ''अजॉय मेहता याना देखील सुचवलं आहे की तुम्ही सोलापूरात जाऊन आढावा घ्या. सरकारने जे निर्णय घेतलेत त्यामध्ये मी कोणताही हस्तक्षेप केला नाहीये. सोलापूरशी माझे ऋणानुबंध आहेत म्हणून मी या ठिकाणी आलो आहे'', असे देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या