महावितरणाच्या विरोधात ठाणेकरांचा एल्गार, सोशल माध्यमांतून एक लाखांहून अधिक ग्राहक एकत्र
ठाणेकरांनी एकत्रित येऊन महावितरणने पाठवलेल्या अन्यायी वाढीव वीज बिलांच्या विरोधात सोशल माध्यमांतून एल्गार पुकारला आहे. यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोक एकत्र आले आहे.
ठाणे : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने गेल्या तीन महिन्यांचं एकत्रित बिल वीज ग्राहकांना पाठवलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे पाचपट विजबिल पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वीजग्राहकांना महावितरणचा झटकाचं बसलेला आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातील घोडबंदर परिसरातील 35 अपार्टमेंट्स आणि कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी एकत्रित येऊन महावितरणने पाठवलेल्या या अन्यायी वाढीव वीज बिलांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सोशल माध्यमांचा आधार घेत या परिसरातील एक लाखाहून अधिक लोक एकत्र आले असून त्यांनी आता महावितरणच्या विरोधात आवाज उठवला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत महावितरणने देखील वीजमीटर रिडींग घेतलं नव्हतं. सर्वच लोक घरांमध्ये असल्यामुळे टीव्ही, फॅन, लाइट्स, एसी , फ्रीज यासह अन्य विद्युत उपकरण घरी सुरूच असतील असं अनुमान काढत महावितरणने तीन महिन्यांचं सरसकट वीज बिल ग्राहकांच्या माथी मारलेलं आहे. हे विजबिल पाहिल्यानंतर अनेकांना महावितरणचा जनू शॉकच लागलेला आहे. कारण तीन महिन्यांचं एक पट, नव्हे दोन पट नव्हे, तर तब्बल तीन ते पाच पट बिलं नागरिकांना पाठवण्यात आलेली आहेत. ज्याना 1200 ते 2000 रुपयांपर्यंत बिल यायचं त्यांना 25 ते 35 हजार रुपयांपर्यंत बिलं आली आहेत, तर अनेकांना 35 हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंतची बिलं महावितरण बिनधास्तपणे पाठवलेली आहेत. या बिलांचा संपूर्ण अभ्यास करून ठाण्यातील घोडबंदर परिसरातील काही जागरूक नागरिकांनी या बिलातील उणिवा या महावितरण अधिकाऱ्यांना दाखवल्या. मात्र त्यांनी केवळ आम्ही वरिष्ठांना याची कल्पना देऊ असं म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
महावितरण कडून कोणतही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे घोडबंदर परिसरातील नागरिकांनी व्हॉट्सअॅप ग्रृपच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात केली. या व्हॉट्सअॅप ग्रृपवर त्यांनी आपली बिल एकमेकांना शेअर करायला सुरुवात केली. यातून चर्चा घडवून घोडबंदर परिसरातील 35 हून अधिक अपार्टमेंट्स आणि अनेक कॉम्प्लेक्समध्ये रहात असलेल्या नागरिकांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केलाय.
महावितरणने पाठवलेल्या बिलांसंदर्भात जेव्हा नागरिक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले त्यावेळी त्यांनी हे बिल तीन टप्प्यांमध्ये भरण्याच्या सूचना केल्या. पण एवढ्या विजेचा वापर झालेला नसताना आम्ही ही बिलं का भरायची? असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. महावितरण मनमानी पद्धतीने बिल ग्राहकांच्या माथी मारून ती वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या विरोधात आम्ही लढा उभा करू असा निर्धार इथल्या नागरिकांनी केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदर परिसरातील अपार्टमेंट्समधील नागरिकांनी एक समिती बनवली असून याद्वारे महावितरणच्या विरोधामध्ये एक लाखाहून अधिक ग्राहकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकसह इतर सोशल माध्यमांचा वापर करून ठाणे परिसरातील लोकांना एकत्रित करण्यास सुरुवात झालेली आहे.
अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल : योगिनी चोबल ( नागरिक)
तीन महिन्यानंतर घोडबंदर परिसरातील नागरिकांना जेव्हा वीज बिल मिळाली त्यावेळी सर्वांनाच एक मोठा शॉक बसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. कारण ही बिलं एक पट नव्हे तर तब्बल पाच पट आल्याचं आमच्या निदर्शनास आलं. यासंदर्भात सर्व नागरिकांनी एकमेकांना आपल्या बिलासंदर्भात विचारणा केली , त्यावेळी घोडबंदर परिसरात सरसकट महावितरणने अशा पद्धतीने वीज बील पाठवल्याचं आमच्या निदर्शनास आलं. या गोष्टी महावितरणच्या निदर्शनास आणून देऊन देखील योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आम्ही सर्वांनी या परिसरातील एक लाखाहून अधिक वीज ग्राहकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने जर याची दखल घेतली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्याची तयारीही आम्ही केलेली आहे.
आम्ही अन्यायकारक विज बिल का भरायची ? : श्रीकांत सोनावणे ( नागरिक)
लॉकडाउन मूळ अनेकांचे रोजगार गेलेत, नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीमध्ये महावितरणने याचा गैरफायदा घेत आम्हाला एवढी भरमसाठ वीज बिल पाठवलेली आहेत. मी वर्क फ्रॉम होम करत नाही. माझ्या घरी देखील जास्त विजेचा वापर होत नाही. मग दिवसभर घरी कोणी नसताना मी 28 हजार रुपयांचे बिल कसं भरायचं याचा खुलासा महावितरण द्यायला तयार नाही. या संपूर्ण बिलांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. ज्या गोष्टीचा वापर आम्ही केलेलाच नाही त्याबद्दल आम्ही अन्यायकारक विज बिल का भरायची ? ही बिले जर मागे घेतली नाहीत तर आम्हाला महावितरणच्या विरोधात लढा उभा करावा लागेल.