(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे महापालिकेने पाणी पुरवठा कर न भरलेल्या 1 हजार 313 नळ जोडण्या तोडल्या
तिजोरीतील खडखडाट भरुन काढण्यासाठी ठाणे महापालिका थकीत कर आणि देयकांच्या वसुलीवर भर देत आहे. याबाबत विशेष मोहीम राबवत पाणी पुरवठा कर न भरलेल्या 1 हजार 313 नळ जोडण्या महापालिकेने तोडल्या आहेत.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट भरुन काढण्यासाठी आता थकीत कर आणि देयकांच्या वसुलीवर जास्त लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वीच महानगरपालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी मालमत्ता आणि पाणी पुरवठा कर जास्तीत जास्त वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करत पालिका अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवत 1 हजार 313 नळ जोडण्या बंद करुन टाकल्या आहेत. यामध्ये पाणी बिलाची देयके न भरणारे आणि मागील थकबाकीदार यांचा समावेश आहे. यापुढे देखील अशीच जोरदार कारवाई सुरु असणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोरोना काळात प्रचंड पैसा खर्च झाला मात्र विविध सवलती दिल्याने महापालिकेला कर स्वरुपात मिळणारा पैसा अतिशय कमी प्राप्त झाला. त्यामुळे आता कर वसुली करुन तिजोरी भरण्याचे काम महापालिका आयुक्तांनी सुरु केले आहे, जेणेकरुन समाजोपयोगी कामे करता येतील. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरता विशेष मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडित करुन पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सील करणे, पंप जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत 21 डिसेंबरला तब्बल 107 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आणि त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच आजपर्यंत एकूण 1313 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरुन महापालिकेला सहकार्य करावे आणि आपल्यावर होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.