Kopri Bridge Work : कोपरी पुलाच्या पाडकामासाठी वाहतूक विभागाची रंगीत तालीम
मुख्य पुलाचे काम सुरू झाल्यास वाहतुकीचा भार कसा राहील तसेच पर्यायी मार्गाने वाहतूक मिळवल्यास कोणत्या ठिकाणी कोंडी होऊ शकते याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याला जोडणारा जुना कोपरी ब्रिज पाडून त्या जागी नवा कोपरी ब्रिज उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आता दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन दिवस पिक अवर्समध्ये वाहतूक विभागाकडून चाचणी घेण्यात येणार आहे. कोपरी उड्डाणपुलाच्या जुन्या मुख्य मार्गिका दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक शाखेकडून ऐन गर्दीच्या वेळी बंद ठेवण्यात येतील अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मुख्य पुलाचे काम सुरू झाल्यास वाहतुकीचा भार कसा राहील तसेच पर्यायी मार्गाने वाहतूक मिळवल्यास कोणत्या ठिकाणी कोंडी होऊ शकते याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 आणि 17 नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत वाहन गुरुद्वारा सेवा रोड वरून मुंबईच्या दिशेने वळवण्यात येतील. तर संध्याकाळी पाच ते नऊ दरम्यान हरी ओम नगर कडून सेवा रस्त्याने गुरुद्वारा मार्गे तीन हात नाका येथे वाहने लावण्यात येतील. तर दुसरीकडे तीन हात नाका पुलावरून कोपरी पुलाकडे येणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने उतरणाऱ्या आणि पुलाखालून येणाऱ्या वाहनांची एकत्रित कोंडी होणार नाही. 16 आणि 17 तारखेच्या रंगीत तालमी नंतर जुन्या मार्गांच्या कामासाठी एमएमआरडीएकडून हा पूल ताब्यात घेण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
भविष्यात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या नव्या बदलांना तोंड द्यावे लागणार आहे. कोपरी उड्डाण पूल धोकादायक झाल्याने 2018 पासून या उड्डाणपुलाच्या पुनर्निर्माणचे आणि रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए करत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला दोन नवीन मालिका उभारून झाल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात जुना उड्डाणपूल तोडून त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
इतर बातम्या :
रावण जगातला पहिला पायलट, त्याच 'पुष्पक' विमान हे सत्य; श्रीलंकेतल्या लोकांचा दावा, संशोधनाला सुरुवात
पुस्तकातील लेखन भोवले; काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, जाळपोळ
Ahmedabad Municipal Corporation: अहमदाबादमध्ये 'या' ठिकाणी अंडी आणि मांसाहार विकण्यास बंदी, महापालिकेचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha