Thane Coronavirus : ठाणे महापालिका कोरोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी लपवतेय?
एकीकडे ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला पंधराशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. अनेक रुग्णांना बेड्सही उपलब्ध होत नाहीत. तसेच औषधांची देखील कमतरता आहे. असे असताना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा मात्र अतिशय कमी दिसून येतोय.
ठाणे : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून पुढच्या 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अशातच ठाण्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, ठाणे महानगरपालिका कोरोना बाधित रुग्णांचे आकडे लपवत आहे की, काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
ठाणे महापालिकेच्या दैनंदिन आकडेवारीनुसार, एप्रिलच्या 11 दिवसांमध्ये 57 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, शहरातील तीन स्मशानभूमींमध्ये गेल्या 11 दिवसांमध्ये 309 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची नोंद आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिका कोरोना बाधित आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवत आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. कारण स्मशानभूमीत येणारे मृतदेह आणि महापालिका देत असलेले मृतांचे आकडे यात मोठी तफावत बघायला मिळत आहे.
एकीकडे ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला पंधराशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. अनेक रुग्णांना बेड्सही उपलब्ध होत नाहीत. तसेच औषधांची देखील कमतरता आहे. असे असताना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा मात्र अतिशय कमी दिसून येतोय. ठाण्यातील स्मशानभूमीमध्ये रोज येणाऱ्या मृतदेहांचा आकडा प्रचंड जास्त आहे. रोज स्मशानभूमीमध्ये मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागते आहे. मग ठाणे महानगरपालिका देत असलेला आकडा अतिशय कमी कसा, असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत ठाण्यात मनसेने देखील पालिकेच्या कारभारावर आरोप केला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी मध्ये असलेला हा घोळ पाहून याबाबत ठाणे महानगर पालिकेतील काही संबंधित अधिकाऱ्यांशी एबीपी माझाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर महापालिकेने आणि सत्ताधारी शिवसेनेने देखील संशयित कोरोना रुग्णांचे कारण सांगितले. यानंतर आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य स्मशानभूमीत या गोष्टींची पडताळणी करण्यास गेलो असता तिथे अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रांगेत असलेले आम्हाला आढळून आले.
संशयित कोरोना बाधितांच्या मृत्युपत्रावर कोरोनामुळे मृत्यू असे येत असल्यामुळे पालिका देत असलेले कारण न पटण्यासारखे आहे. दोन्ही आकड्यांमध्ये असलेली ही तफावत अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका खरंच मृत्यू लपवते आहे का हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :