दुकानांवर निर्बंध आणि डान्सबार बेबंद; ठाण्यातील तीन डान्सबारचा पर्दाफाश, एबीपी माझाच्या दणक्यानंतर शासनाला जाग
ठाण्यातल्या आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचा एबीपी माझाने पर्दाफाश केला आहे. शासनाचे निर्बंध झुगारुन हे तीनही बार दणक्यात सुरु होते.
मुंबई : कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधनं आहेत. डान्सबारवर बंदी असतानाही, ते राजरोसपणे सुरु आहेत. एबीपी माझाने ठाण्यातल्या 3 डान्सबारचा स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश केला. कोरोनाचे सगळे नियम धुडकावून इथे डान्सबार सुरु होता.
ठाण्यातल्या आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचा एबीपी माझाने पर्दाफाश केला आहे. कोरोनाचे नियम डाब्यावर बसवून हे तीनही बार दणक्यात सुरु होते. एखाद्या ठिकाणी असं सुरु असतं तर ठिके पण ठाण्यातील तीन बारमध्ये हे सर्व अनधिकृतपणे सुरु होतं. आता डान्सबार नुसते सुरु होते असं नाही तर डान्सबारमध्ये प्रवेशासाठी चक्क रांगा लागल्या होत्या. तेही रात्री. म्हणजे आपल्याकडे रात्री किराणा मिळणार नाही पण डान्सबारसाठी रांगा मात्र लागू शकतात.
अँटिक पॅलेस डान्सबारचं शटर बंद होतं पण मागच्या चोर दरवाजाने आत एन्ट्री मिळत होती. तिथल्या लोकांनी एपीबी माझाच्या प्रतिनिधींचे मास्क उतरवले, त्यांची माहिती घेतली. विश्वास बसल्यानंतर त्यांना आत सोडण्यात आलं.
ठाणे शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या डान्सबारमध्ये सध्या काय सुरु आहे हे इथल्या पोलिसांना माहित नसेल का? या बारमधला आवाज बारच्या दरवाजाबाहेर येत नाही, हे खरंय. पण बड्या बड्या गुन्ह्यांचा सुगावा लावणाऱ्या आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेल्या ठाणे पोलिसांना याची कुणकुणही लागत नाही, यावर कसा विश्वास ठेवायचा? सरकारनेही आपला प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे तातडीने कारवाईचे आदेश
डान्स बारप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन एसीपी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर दोन एसीपी अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरून काढून कंट्रोल रूमला बदली केली आहे. अतिरिक्त आयुक्तांना या सर्व प्रकरणाची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.