राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना
Maharashtra Political Crisis : एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होतील. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे.
मुंबई : राज्य गुप्तचर विभागाने अर्थात एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होतील. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली आहे.
राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरलं आहे.
एसआयडीने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती. अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते, असं सूत्रांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात खळबळ
राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागले आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.