एक्स्प्लोर
डोंबिवलीत शिवसेनेची पोलिसांविरोधात निदर्शनं

मुंबई : डोंबिवलीतील टिळकनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याचं आज नव्या इमारतींमध्ये स्थलांतर करण्यात आलं. मात्र कार्यक्रम पत्रिकेत शिवसेना नेत्यांचं नाव नसल्याने शिवसैनिकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या दोन्ही नव्या इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमांच्या पत्रिकेतून शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह कुठल्याही नेत्याच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. शिष्टाचाराचा भंग झाल्याचा आरोप करत शिवसेनेने पोलीस आयुक्तांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत टिळकनगर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केली. यावेळी पोलिसांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी या कार्यक्रमात राजकारण केल्याचा आरोप करत पोलिसांवर हक्कभंग आणण्याची मागणी करणार असल्याचं यावेळी डोंबिवलीचे शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितलं. तर पोलिसांनी मात्र यानंतर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा























