#मराठीतशपथ : शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतच शपथ घेणार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची माहिती
मराठीत शपथ घेण्याच्या मोहिमेला 'एबीपी माझा'ने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेण्याची तयारी दर्शवली आहे. अभिमानास्पद भाषेतूनच आपण खासदारकीची शपथ घेणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.
कल्याण : शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतच शपथ घेतील, असं कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. शिवसेना सातत्यानं मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संघटना आहे.
मागील दहा वर्षांपासून शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा अभिमानास्पद भाषेतूनच आपण खासदारकीची शपथ घेणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. खासदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारांना भेटण्यासाठी डोंबिवलीत आले होते.
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर नेटीझन्सकडून केली जात आहे. यासाठी #मराठीतशपथ हा हॅशटॅग वापरुन नेटीझन्स अनेक पोस्ट ट्विटरवर शेअर करत आहेत. या मोहिमेला 'एबीपी माझा'ने देखील पाठिंबा दिला.
एबीपी माझाच्या पाठिंब्यानंतर राज्यातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचे खासदार सोडले, तर बहुतांश खासदार हे हिंदी किंवा इंग्रजीतून शपथ घेताना दिसतात. त्यामुळे हीच प्रथा मोडित काढण्यासाठी आणि अभिजात दर्जाच्या आग्रहासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.
नवनिर्वाचित खासदारांना कोणत्या भाषेत शपथ घ्यायची आहे, याचा पर्याय दिला जातो. खासदारांना आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा पर्यात उपलब्ध आहे, त्यामुळे राज्यातील खासदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ मराठीत घेण्याची नेटीझन्सची मागणी आवास्तव नाही.
आणखी वाचा