महाराष्ट्रातलं सरकार पाडून दाखवा, संजय राऊतांचं भाजपला चॅलेन्ज
मध्यप्रदेशनंतर आता भाजपनं राजस्थानकडे मोर्चा वळवला आहे. पण हा घोडेबाजार महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपचं मिशन लोटस असेल तर आमचं मिशन लोटांगण असेल. आम्ही भाजपला लोटांगण घालायला लावू, असं संजय राऊत यांनी मत व्यक्त केलंय.
मुंबई : मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये सत्ताबदलाच्या जोरदार घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच भविष्यात महाराष्ट्रातही अशा घडामोडी घडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. मध्यप्रदेश असेल किंवा राजस्थान अशा प्रकारचं सत्ताबद्दल हे लोकशाहीसाठी पोषक नाही. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे, त्यामुळे सरका कोणी पाडायचा प्रयत्न करू नये. हिंमत असेलच तर आमचं सराकर पाडून दाखवावं असं थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलंय. त्यामुळे पुढच्या काही दिवसात आता चांगलंच राजकारण रंगणार आहे.
भाजपनं महाराष्ट्रासाठी मुहूर्त शोधावा
महाराष्ट्रालं सरकार पाडायला भाजपला मुहूर्त शोधावा लागेल. सत्ता बदलायला साडेतीन मुर्हूताची गरज नाही. भाजपला सत्तेचा माज असल्याची टीका संजय राऊत करायला विसरले नाहीत. मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडून भाजपनं काहीही हाती मिळवलं नाहीय. सध्या मध्य प्रदेशमध्ये कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सत्ता बदल करताना भाजपच्या डोक्यात फक्त सत्ता असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपनं अशीच सत्ता उलथवून लावली होती. मध्यप्रदेशनंतर आता भाजपनं राजस्थानकडे मोर्चा वळवला आहे. सचिन पायलट काही आमदारांसोबत दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. भाजपनं सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार केल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केलाय. पण हा घोडेबाजार महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपचं मिशन लोटस असेल तर आमचं मिशन लोटांगण असेल. आम्ही भाजपला लोटांगण घालायला लावू, असं संजय राऊत यांनी मत व्यक्त केलंय.
मध्यप्रदेश, राज्यस्थानसारखं महाराष्ट्रात चालणार नाही
महाराष्ट्रात सत्तापालट करणं हे भाजपला सोपं जाणार नाही असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय. त्याचं कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आपली स्वाभिमानी भूमी आहे. या महाराष्ट्र असे धंदे चालत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रावर जे संकंट आलं आहे ते दूर करणं गरजेचं आहे. सरकार पाडण्यासाठी पडद्यामागं बसायचं आणि मग बोलायचं सरकार पाडणार तर तुम्ही सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हान संजय राऊत यांनी दिलंय. महाराष्ट्राला कोरोनाच्या संकंटातून बाहेर काढण्याऐवजी आणखी खोलात ढकलत असाल तर हा अफजलखानी विडा उचलल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच या महाराष्ट्राला संकंटातून बाहेर काढण्याची विनंती त्यांनी सर्वपक्षीयांना केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
शिवसेना नेते संजय राऊत यांनी चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलंय. राऊत फडणवीस यांच्यातलं द्वंद सर्वांनाच माहित आहे. पण आज चक्क राऊत यांनी फडणवीसांबद्दल स्तुतीसुमनं उधळली आहे. देवेंद्र फडणवीस हे कोरोनाकाळात चांगलं काम करतायत. विरोधी पक्षाची भूमिका ते उत्तमरितीनं पार पाडतायत. फडणवीस हे एक अभ्यासू आमदार आहेत. त्यांनी आपल्या अभ्यासाचा फायदा राज्य वाचवण्यात केला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र राज्याचं सरकार कसं चालवायचं हे त्यांना चांगलं माहित आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही बांधला नाहीय. अनेक राज्यकर्ते आले आणि गेले असल्याचं सांगायलाही राऊत विसरले नाहीत. देशातलं कुठलंही सरकार अस्थिर करू नये. असं राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं.
भाजपचं डोकं सॅनिटाईज केलं पाहिजे
भाजपला प्रत्येक ठिकाणी सत्ता दिसते. भाजप देशातील सध्या मोठा पक्ष आहे. आजूबाजूला विरोधी पक्षच ठेवायचा नाही, असं त्यांनी ठरवलं असेल तर ही आणाबाणी झाल्याची टीका संजय राऊत यांनी केलीय. भाजपनं थोडं समाधानी असायला पाहिजे. प्रत्येक वेळी सत्तेचा विचार करून चालत नाही. भाजपच्या डोक्यातल्या सत्तेच्या विचारांवर आता सॅनिटाईझर मारायची गरज असल्याची बोचरी टीका राऊतांनी केलीय. महाराष्ट्रातले आमदार किडनॅप करून चंद्रावर नेणार का? असा सवालही यावेळी उपस्थित केला. वाघ जेव्हा शिकार करण्यासाठी झेप घेतो तेव्हा तो 20 फूटांपर्यत झेप घेऊ शकतो. त्यांच्यापुढं आम्ही उभे आहोत, असं देखील सांगायला राऊत विसरले नाहीत.
संजय राऊत राज्यपालांवर काय म्हणाले ?
राजभवनातील कोरोनाची लागण गांभीर्यानं घेतली पाहिजे. परीक्षा घ्या हा आग्रह चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलं. राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. परीक्षा घ्या, परीक्षा घ्या… हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आग्रह किती चुकीचा आहे, हे त्यांना नियतीनंच दाखवून दिलंय. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, हे ईश्वरानं दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, ईश्वर यांना मानणारे आहेत.
Sanjay Raut | हे मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे; कोणताही मुहूर्त काढा, आमचं सरकार 5 वर्ष चालेल : संजय राऊत