(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू सुसाट! दररोज 30 हजार वाहनांची ये-जा, दहा दिवसांत 61 लाखांचा टोल जमा
मुंबईतून नवी मुंबईमार्गे पनवेलपर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा दीड-दोन तासांचा वेळ आता केवळ पंधरा मिनिटांवर आला आहे. त्यामुळं वाहनचालक आणि मालकांकडून दूरवरच्या प्रवासासाठी या सेतूचा वापर वाढताना दिसत आहे.
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या उरण-अलिबागसह कोकणात किंवा पुण्यामार्गे दूरचा प्रवास करण्यासाठी मुंबईकरांची सध्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूला (Shivdi Nhava Sheva Atal Setu) मोठी पसंती मिळत आहे. 21 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूवरून दररोज तब्बल 30 हजार वाहनं ये-जा करत आहेत. त्यामुळं गेल्या दहा दिवसांत टोलच्या माध्यमातून तब्बल 61 लाख 50 हजार रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळाला आहे.
राज्य सरकारनं एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं मुंबई ते पनवेल हे प्रवासाचं अंतर कमी झालं आहे. मुंबईतून नवी मुंबईमार्गे पनवेलपर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा दीड-दोन तासांचा वेळ आता केवळ पंधरा मिनिटांवर आला आहे. त्यामुळं वाहनचालक आणि मालकांकडून दूरवरच्या प्रवासासाठी या सेतूचा वापर वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत या सागरी सेतूवरून येजा करणाऱ्या वाहनांची दैनंदिन संख्या 30 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
शिवडी न्हावाशेवा पुलासाठी 250 रूपये टोल
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा एक गेमचेंजर प्रकल्प आहे. दक्षिण मुंबईला थेट रायगड जिल्ह्याशी जोडणारा कनेक्टर आहे. देशातल्या सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचं लोकार्पण 12 जानेवारीला झाले. या पुलावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. शिवडी न्हावाशेवा पुलासाठी 250 रूपये टोल आकारण्यात येतो. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचा खर्च 21 हजार 200 कोटींवर गेलाय. सुमारे 30 वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.लांबीच्या निकषाने जगातील दहाव्या क्रमांकाचा हा सागरी सेतू आहे. संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा हा सागरी सेतू आहे.
सेल्फी काढणाऱ्यांना दंड
भारतातील सर्वात मोठा असलेल्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे आकर्षण असल्याने मोठ्या संख्येने प्रवाशी या मार्गावर येत आहेत. आपल्या परिवारासह आलेले पर्यटक सागरी सेतूवर थांबून सेल्फी काढतात. तर अनेक जण सनसेट कॅमेऱ्यात कैद करतात. नवी मुंबई , पनवेल, मुंबई तसेच इतर भागातूनही पर्यटक हा सेतू पाहण्यासाठी येत आहेत. पोलीसांच्या माध्यमातून सागरी सेतूवर गाड्या थांबविण्यास मनाई करूनही लोकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र अपघाताचा धोका पाहता सागरी सेतूवर गाड्या थांबवून फोटोशूट करणाऱ्यांवर नवी मुंबई आणि मुंबई पोलीसांनी जोरदार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. जवळपास 500 गाड्यांना दंड लावण्यात आला आहे.
हे ही वाचा :