Sanjay Raut : बनावट जात दाखल्याप्रकरणी खा. नवनीत राणा जामिनावर; संजय राऊत यांच्याकडून ते FIR ट्वीट
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. 'तर हे असं आहे' म्हणत संजय राऊतांनी एक FIR कॉपी ट्वीट केली आहे.
Sanjay Raut On Navneet Rana : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. 'तर हे असं आहे' म्हणत संजय राऊतांनी एक FIR कॉपी ट्वीट केली आहे. 2014 साली नवनीत राणा यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याची ही FIR आहे. या गुन्ह्यात नवनीत राणा यांच्यासह त्यांचे वडील हरभजनसिंह कुंडलेस यांना अटक देखील करण्यात आली होती, असं नमूद आहे.
संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या या तक्रारी अर्जात फिर्यादी जयंत वंजारी हे आहेत. यात म्हटलं आहे की, नवनीत राणा आणि हरभजन सिंह कुंडलेस यांनी मोची जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी जन्माची नोंद 6-8-2012 रोजी ढेकाळे, पालघर जि. ठाणे येथे केली. तसेच प्रथम हरभजन सिंह कुंडलेस यांचे मुन्सिपल उच्च प्राथमिक शाळा बोरीवली प 93 या शाळेचा इयत्ता 4 थी पास झाल्याचा शाळा सोडल्याचा 24-08-1960 दाखला नं 11046 जन्म ठिकाण ठाणे आणि 25-08-1960 रोजीचा दाखला 11166 मध्ये जन्म ठिकाणी मुंबई असे बनावट दाखले तयार केले. तसेच नवनीत कौर हरभजनसिंह कुंडलेस यांचा जातीचा दाखला मिळणे सुलभ व्हावं यासाठी कार्तिका हायस्कूल व ज्यूनियर कॉलेजचा शाळा सोडल्याचा 1995 च्या दाखल्यावर मोची जातीचा उल्लेख 23-08-2013 साली करुन नमूद शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत घेतली, तसेच रेशन कार्डवरही मोची जातीची नोंद केली.
तर हे असे आहे . pic.twitter.com/6WUSsGS1NH
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2022
तक्रारी अर्जात म्हटलं आहे की, या कागदपत्रांचा वापर करुन हरभजनसिंह कुंडलेस यांनी तहसील, सेतू सुविधा केंद्र ठाणे मधून मोची जातीचा दाखल मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत सादर केली नसल्यानं फेटाळण्यात आला. त्यानंतर कुंडलेस यांनी पालघरमध्ये मोची जातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला पण तिथंही जाती एस आर नंबर नमूद नसल्यानं अर्ज फेटाळला, असं या FIRमध्ये म्हटलं आहे.
FIRमध्ये म्हटलं आहे की, हरभजन सिंह कुंडलेस यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करुन स्वत:चा मोची जातीचा बनावट दाला 30-07-2013 रोजी प्राप्त केला. या नमूद बनावट कागदपत्रांचा वापर करुन नवनीत राणा यांनी 30-0-2013 रोजी प्राप्त केला व चेतना कॉलेजमध्ये क्लार्क पदाच्या नोकरीच्या कारणासाठी जात पडताळणी समितीकडून मोची जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेतली. याच जाती प्रमाणपत्राचा वापर करुन अमरावती लोकसभा मतदार संघातून खासदार पदासाठीची निवडणूक लढवली असं या अर्जात म्हटलं आहे.