Sanjay Raut : संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्लाबोल; सांगितल्या चार गोष्टी अन् संपवला विषय!
'सामना'च्या आपल्या रोखठोक सदरातून ( Saamana Article) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut On BJP RokhThok Column : 'सामना'च्या आपल्या रोखठोक सदरातून ( Saamana Article) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. काश्मीरातील हल्ले, सर्वाधिक बेरोजगारी, नामांतराच्या विषयावरुन त्यांनी भाजपला सवाल केले आहेत. राऊतांनी म्हटलं आहे की, जागतिक नेत्यांच्या गर्दीत आपले पंतप्रधान मोदी हे सर्वात पुढे दिसतात ही अभिमानाचीच गोष्ट आहे, पण देशात बेरोजगारीचा आकडा वाढतो आहे. पंजाब, कश्मीर अशांत झाले आहे आणि राजकारण वेगळ्याच दिशेने भरकटले आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
देशाची नवी पिढी कोणत्या दिशेने निघाली आहे?
संजय राऊतांनी म्हटलं आहे की, आपल्या देशात सध्या राजकारणाचा जो खेळखंडोबा सुरू आहे, तो पाहता सुजाण जनतेची मती कुठीत झाली आहे. लोकांना भडकवणे, त्यांना पेटवापेटवी करण्यास प्रवृत्त करणे हेच राजकारण असे आपल्या नेत्यांना वाटत आहे. आंध्र प्रदेशात पिनिपे विश्वरूप या परिवहन मंत्र्याचे घरच संतप्त लोकांनी जाकून टाकले. कारण काय? नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा असे नाव केले. त्यामुळे लोक भडकले आणि मंत्र्याचे घर जाळले. या संपूर्ण भागात हिंसाचार व जाळपोळ सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावास इतका विरोध व्हावा याचे मला आश्चर्य वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देश उभा आहे. त्यांच्या नावास विरोध व्हावा हे आश्चर्य आहे. देशाची नवी पिढी कोणत्या दिशेने निघाली आहे? एरवी विश्वाला मार्गदर्शन करणारे पंतप्रधान मोदी अशा वेळी मौन बाळगतात याचे आश्चर्य वाटते. एखाद्या शहराचे नामांतर करण्याचे अधिकार केंद्राचे असतात. प्रस्ताव केंद्राकडे जातो. त्यानुसार कोनासीमा जिल्ह्याचे नामांतर डॉ. आंबेडकरांच्या नावे झाले. मग विरोध का? औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी जुनीच आहे. त्यावर केंद्र सरकार का निर्णय घेत नाही? की संभाजीनगरमध्येही नामांतरावरून दंगली व्हाव्यात आणि त्या आगीवर राजकीय भाकऱ्या शेकाव्यात अशी कुणाची इच्छा दिसते? असा सवाल त्यांनी केला आहे.
कश्मीरातील हल्ल्यांवरुनही सवाल
संजय राऊतांनी म्हटलं आहे की, जम्मू-कश्मीर प्रांतात सातत्याने अतिरेक्यांचे हल्ले सुरूच आहेत. श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याची सात वर्षांची मुलगी जखमी झाली. हवालदार कश्मिरी पंडित नव्हता. हवालदाराचे नाव सैफुल्लाह कादरी. त्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. याआधी पुलवामातील पोलीस उपअधीक्षकास अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. राहुल भट्ट या कश्मिरी पंडितास तहसील कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या, पण गेल्या दोन महिन्यांत कश्मीर खोरयात 12 मुसलमान पोलीस अधिकारी मारले गेले ही वस्तुस्थिती आहे. हिंदू आणि मुसलमान यांची पर्वा न करता कश्मीर खोरयात अतिरेक्यांचा खुनी खेळ सुरू आहे. जे देशाच्या बाजूने आहेत त्यांचा खात्मा करायचा असे अतिरेक्यांचे धोरण आहे. भाजपला फक्त एकाच समाजाची, धर्माची बलिदाने दिसतात. हे 'राष्ट्रीय एकात्मतेचे लक्षण नाही. देशासाठी बलिदान देणारा हिंदू जितका प्रिय, तितकाच त्याच देशासाठी बलिदान देणारया मुसलमानाचाही सन्मान व्हायला हवा.
संजय राऊतांनी सांगितलेल्या चार गोष्टी
1) पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आले. प्रत्येक कामात टेंडरमध्ये ते एक टक्का कमिशन मागत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. एक टक्का कमिशन मागणारे मंत्री फक्त एका महिन्यात निपजले.
2) औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने उकरून काढला आहे. बाबरीप्रमाणे औरंगजेबाची कबर हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा ठरत असेल तर भाजपने कुदळ-फावडी घेऊन त्या कबरीची बाबरी करण्याचे धाडस दाखवावे, पण सत्य असे की, औरंगजेबाची कबर भारत सरकारच्याच पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येते आणि आता ही कबर पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला आहे. यावर भाजप मंडळाचे काय म्हणणे आहे?
3) ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि कुतुबमिनारच्या मालकीवरून भाजपच्या उठवळ हिंदुत्ववाद्यांनी नवे बाद सुरू केले आहेत. मोगलांचे राज्य दिल्ली व आसपासच्या परिसरात 800 वर्षे होते. मोगलांकडून ते राज्य ब्रिटिशांनी घेतले. ताजमहाल, कुतुबमिनार मोगलांनीच बांधले. त्याखाली मंदिर होती असे आता संशोधन सुरू आहे. यावर "मोगलांचा इतका राग करता, मग मोगलांच्या बायका कोण होत्या?" असा पांचट प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला. जोधाबाई अकबराची पत्नी होती, तर मस्तानी पराक्रमी बाजीरावाची होती. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवले, पण देशाच्या राजकारणातून आज मानवी नाते व सन्मान नष्ट झाला आहे. आपल्याच देशातील राजकारणाला आपण वळण देऊ शकलो नाही, जगाला काय दिशा देणार?
4. देशात एकपक्षी व एकछत्री अंगल आहे. पण प्रत्येक राज्य स्वतचे वेगळे राजकारण खेळत आहे. पंजाब, कश्मीर पुन्हा अशांत होत आहेत, पण इतर राज्यांनीही स्थिर राहू नये यासाठी केंद्रच प्रयत्न करीत असेल तर हा देश टिकणार कसा? जागतिक नेत्याच्या फोटोत मोदी सर्वात पुढे याचे कौतुक करायचे की जगाच्या बेरोजगारीत आपण पुढे याची खंत बाळगायची, असं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.